पुणे: पुणे शहरात गुलेन बॅरी सिंड्रोम (Guillain Barre Syndrome) या मेंदूविषयक आजाराचे एकूण 59 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता महानगरपालिका अलर्ट मोडवरती आली असून याबाबतच्या सर्वाधिक रुग्ण किरकटवाडी, धायरी, सिंहगड रस्ता या परिसरात आहेत. जीबीएस (Guillain Barre Syndrome) स्थितीचा अभ्यास आणि विश्लेषण, यासाठी स्थापन करण्यात आलेले शीघ्र कृती दल अलर्ट मोडवर आले आहे. सिंहगड रस्ता परिसरातील पाण्याचे नमुने गोळा करण्यास सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर योग्य त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. तर हा आजार कशामुळे होतो याबाबतची माहिती आता समोर आली आहे. (Guillain Barre Syndrome) 


पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरात अलीकडेच गुलेन बॅरी सिंड्रोमचा  (Guillain Barre Syndrome) (जीबीएस)चे रूग्ण आढळून आले आहेत. रुग्णांमध्ये कॅम्पिलोबॅक्टर या जीवाणूमुळे हा आजार बळावल्याचा संशय डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. जीवाणूचा प्रसार दूषित अन्न किंवा पाण्याद्वारे होत असल्याचे न्यूरोलॉजिकल सोसायटी ऑफ पुणेतर्फे सांगण्यात आले आहे.


गुलेन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) ही एक दुर्मीळ, परंतु उपचार करण्या योग्य न्यूरोलॉजिकल स्थिती आहे. यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती मज्जातंतूवर हल्ला करते. त्यामुळे शरीराच्या वरच्या आणि खालच्या भागात अशक्तपणा येणे, मान, चेहरा आणि डोळ्यांमध्ये थकवा जाणवणे, हाता-पायांना मुंग्या येणे किंवा सुन्न होणे, अशी लक्षणे आढळून येत आहेत. गंभीर प्रकरणांमध्ये रुग्णांना चालण्यास, गिळण्यास किंवा श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे निदर्शनास सोसायटीचे अध्यक्ष डॉ. राहुल कुलकर्णी यांनी दिली. लक्षणे अनेकदा अचानक सुरू होतात आणि 4 आठवड्यांपर्यंत राहतात. गंभीर प्रकरणांमध्ये आयसीयूमध्ये दाखल करणे आणि व्हेंटिलेटर सपोर्ट आवश्यक असू शकतो. आयव्हीआयजी किंवा प्लाझ्मा एक्सचेंजच्या इंजेक्शनचा वापर केला जाऊ शकतो.


काय काळजी घ्यावी


पाणी उकळून व गाळून प्यावे.
उघड्यावरील व शिळे अन्न खाणे टाळावे.
अचानकपणे हातापायाच्या स्नायूंमध्ये अशक्तपणा जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा किंवा जवळील शासकीय रुग्णालयात जावे.


पुणे शहरात कुठे, किती रुग्णसंख्या


एकूण 59 रुग्णांपैकी 33 रुग्ण पुणे ग्रामीण, 11 रुग्ण पुणे महापालिका, 12 रुग्ण पिंपरी-चिंचवड महापालिका आणि 3 रुग्ण इतर जिल्ह्यांमधील आहेत. त्यापैकी 38 पुरुष आणि 21 महिला आहेत.12 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.


महानगरपालिकेकडून उपाययोजना सुरू


पुणे महानगरपालिकेकडून व जिल्ह्याला बाधित भागामध्ये सर्वेक्षण सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रुग्णांच्या शौचाचे नमुने, रक्त नमुने राष्ट्रीय विषाणू संस्था येथे तपासण्यासाठी पाठवण्यात आले आहेत. शहराच्या विविध भागांतील पाणी नमुने रासायनिक व जैविक तपासणीसाठी राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. आरोग्य जनजागृती करण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना आवाहन करण्यात आले आहे की, जीबीएस रुग्ण आढळून आल्यास त्वरित शासकीय आरोग्य यंत्रणा यांना कळवावे. नागरिकांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नसून आरोग्य विभागाची प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत तयारी आहे.


कॅम्पिलोबॅक्टरमुळे जीबीएस कसा होतो?


दूषित पाणी किंवा अन्न खाल्यावर कॅम्पिलोबॅक्टर जेजुनीचा संसर्ग होऊ शकतो.
संसर्गामुळे अतिसार आणि ओटीपोटात वेदना होऊ शकतात.
काही व्यक्तींमध्ये प्रतिकारशक्ती मज्जातंतूंना लक्ष्य करते. ज्यामुळे १ ते ३ आठवड्यांच्या आत जीबीएसचे निदान होते.
याशिवाय, डेंग्यू, चिकनगुनियाचे विषाणू किंवा इतर बॅक्टेरियाच्या संक्रमणामुळे मज्जातंतूंविरुद्ध रोगप्रतिकारक शक्ती हल्ला करते.


कॅम्पिलोबॅक्टर संसर्गाची लक्षणे


अतिसार
पोटदुखी
ताप
मळमळ किंवा उलट्या