पुणे: आज पुण्यात वसंतदादा शुगर इंस्टीट्यूटची 47वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पारितोषिक समारंभ आज पार पडली आहे. या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), शरद पवार (Sharad Pawar), दिलीप वळसे पाटील यांच्यासह अन्य नेते उपस्थित आहेत. यावेळी बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शेतकऱ्यांना, कारखान्याच्या चालकांना आणि संबधितांना काही अडचण आल्यास मला संपर्क साधा. त्याचबरोबर संस्था व्यवस्थित चालवण्यासाठी संस्था आणि सरकारमध्ये व्यवस्थित समन्वय असण्याची गरज आहे, असं म्हणत मदतीची ग्वाही दिली आहे. त्याचबरोबर अजित पवारांनी यावेळी बोलताना शरद पवारांकडे (Sharad Pawar) एक मागणी केली होती. उत्कृष्ट कामगीरी करणाऱ्या शेतकऱ्यांना बक्षिसाची रक्कम दहा हजार रुपये दिली जाते ती वाढवावी असं अजित पवारांनी म्हटलं होतं ती मागणी शरद पवारांनी त्याच कार्यक्रमामध्ये मान्य केली आहे.
अजित पवारांची मागणी काय?
कार्यक्रमामध्ये बोलताना अजित पवार म्हणाले, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांना बक्षिसाची रक्कम दहा हजार रुपये दिली जाते. आज दहा हजारला फारशी किंमत उरलेली नाही. त्यामुळे ती रक्कम एक लाख रुपये करण्याची मी विनंती करतो. अर्थात वाढ कधी करायची याचा निर्णय शरद पवार घेतील, अशी मागणी यावेळी अजित पवारांनी यावेळी केली आहे. ही मागणी शरद पवारांनी मान्य केली आहे, त्यांनी अजित पवारांच्या भाषणानंतर त्यांच्या भाषणात याबाबतची वाढ केल्याची माहिती दिली.
शरद पवार काय म्हणाले?
आतापर्यंत वैयक्तीक कामगिरीबद्दल संस्थेकडून दिले जाणारे पुरस्कार दहा हजार रुपयांचे होते. आजपासून त्यांची रक्कम वाढवून एक लाख रूपये असेल. अंबालिका साखर कारखान्याला देण्यात येणाऱ्या पुरस्काराची रक्कम दोन लाख होती ती आता पाच लाख रूपये असेल. अजित पवारांनी भाषणात वैयक्तिक पुरस्कारांची रक्कम दहा हजार वरून वाढवून एक लाख करण्याची मागणी केली होती. शरद पवारांनी ही मागणी लगेच मान्य केली. त्याचबरोबर अजित पवारांच्या अंबालिका या खाजगी कारखान्याला बक्षीसाची रक्कम वाढवून दोन लाखांवरुन पाच लाख रुपये देण्यात येईल असे जाहीर केले आहे.
अजितदादा शरद पवारांच्या शेजारी बसणार होते, पण...
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवारांच्या बाजूला बसण्याचं टाळलं. आधी जी बैठक व्यवस्था करण्यात आली होती, त्या बैठक व्यवस्थेत अजित पवार हे शरद पवारांच्या शेजारी बसणार होते. मात्र, आता त्यांच्या जागी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील बसले आहेत. बारामतीत कृषी प्रदर्शनामध्ये देखील हे दोन्ही एकत्रित एकाच व्यासपिठावरती आले होते. मात्र, त्यावेळी देखील शरद पवार आणि अजित पवार यांनी एकमेकांना इग्नोर केल्याचं पाहायला मिळालं होतं. आज देखील या कार्यक्रमामध्ये दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या बाजुला बसण्याचं टाळलं असल्याचं दिसून येत आहे.