पुणे: आज पुण्यात वसंतदादा शुगर इंस्टीट्यूटची 47वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पारितोषिक समारंभ आज पार पडत आहे. या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), शरद पवार (Sharad Pawar), दिलीप वळसे पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित आहेत. त्या आधी विश्वस्त मंडळाची ९ वाजता बैठक पार पडली आहे. या पारितोषिक समारंभासाठी संस्थेचे अध्यक्ष शरद पवार, उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील, संस्थेचे विश्वस्त अजित पवार, हर्षवर्धन पाटील, जयप्रकाश दांडेगावकर यांच्यासह इतर नेते उपस्थित आहेत, या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित आहेत, शरद पवारांच्या उजव्या बाजुला अजित पवार तर डाव्या बाजुला दिलीप वळसे पाटील अशी बैठक व्यवस्था करण्यात आली होती, मात्र, अजित पवारांनी शरद पवारांच्या बाजूला बसण्याचं टाळलं असल्याचं दिसून येत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवारांच्या बाजूला बसण्याचं टाळलं. आधी जी बैठक व्यवस्था करण्यात आली होती, त्या बैठक व्यवस्थेत अजित पवार हे शरद पवारांच्या शेजारी बसणार होते. मात्र, आता त्यांच्या जागी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील बसले आहेत. बारामतीत कृषी प्रदर्शनामध्ये देखील हे दोन्ही एकत्रित एकाच व्यासपिठावरती आले होते. मात्र, त्यावेळी देखील शरद पवार आणि अजित पवार यांनी एकमेकांना इग्नोर केल्याचं पाहायला मिळालं होतं. आज देखील या कार्यक्रमामध्ये दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या बाजुला बसण्याचं टाळलं असल्याचं दिसून येत आहे.
अजितदादांशी संबंधित कारखाना अव्वल, शरद पवारांच्या हस्ते पुरस्कार
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची 48 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पारितोषिक वितरण समारंभ आज (गुरुवारी 23) पार पडणार आहे. शरद पवार वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष तर दिलीप वळसे पाटील हे उपाध्यक्ष आहेत. व्हीएसआयकडून 2023-2024 या वर्षाच्या गळीत हंगामात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पहिल्या क्रमाकांचा पुरस्कार अहिल्यानगर जिल्ह्यातील अंबालिका शुगर प्रायव्हेट लिमिटेड या खाजगी कारखान्याला जाहीर करण्यात आला आहे. हा साखर कारखाना अजित पवारांशी संबंधित मानला जातो.
अजित पवार या कारखान्याच्या संचालक मंडळावर नसले तरी त्यांचे अनेक विश्वासू सहकारी संचालक म्हणून या कारखान्याचे काम पाहतात. अजित पवारांचे विश्वासू जंगल वाघ हे या कारखान्यचे सीईओ असून अजय कांगलकर आणि दिलीप भोसले हे संचालक आहेत. 2021मध्ये काटेवाडीत राहणाऱ्या जंगल वाघ यांच्या घरी आयकर विभागाने छापेमारी देखील केली होती. दुसरा क्रमांक जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील कर्मयोगी अंकुशराव टोपे सहकारी साखर कारखान्याला तर तिसरा क्रमांक धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील न्याचरल शुगर्स एन्ड अलाइड इंडस्ट्रीजला जाहीर झाला आहे. या कार्यक्रमासाठी पुन्हा एकदा शरद पवार, अजित पवार, यांच्यासह अन्य नेते एकाच व्यासपिठावरती असणार आहेत.