Datta Bharne: वाल्मिकजी कराड शरण आले आहेत, मंत्र्यांच्या मित्रानं गुन्हा केला म्हणून मंत्र्यांवर आरोप करणं अयोग्य : दत्तात्रय भरणे
Datta Bharne on Dhananjay Munde : राजकीय वर्तुळात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाले, त्यांच्या राजीनाम्याची मागणी झाली.
Datta Bharne on Dhananjay Munde : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचा ठपका असलेला वाल्मिक कराड याने काल पुण्यातील सीआयडी कार्यालयात आत्मसमर्पण केलं आहे. त्याला सीआयडीच्या 14 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी कराडवर गंभीर आरोप होत असून पवनचक्की प्रकल्पात दोन कोटींच्या खंडणी मागितल्याच्या प्रकरणात कराड मुख्य आरोपी आहे. वाल्मिक कराडच्या मुसक्या आवळण्यासाठी दबाव असतानाच तो सीआयडीला शरण आला आहे. कराड हा धनंजय मुंडेंचा अत्यंत निकटवर्तीय समजला जातो. 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणात कराडचा हात असल्याचा आरोप केला जातो आहे, दरम्यान याप्रकरणी राजकीय वर्तुळात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाले, त्यांच्या राजीनाम्याची मागणी झाली. मात्र, आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि मंत्री दत्तात्रय भरणे यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे.
याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप करणे चुकीचे आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि मंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटले आहे. पुण्यात माध्यमांशी बोलताना दत्तात्रय भरणे म्हणाले, सगळ्यांना माहिती आहे, तपास सुरू आहे. काल वाल्मीकजी कराड शरण गेलेले आहेत. या प्रकरणातील दोषींवरती 100% कारवाई केली जाईल. पंकजाताई आमच्या नेत्या आहेत, धनंजय मुंडे आमचे नेते आहेत आणि शेवटी मी तुम्हाला सांगतो, मित्र कार्यकर्ता प्रत्येकाचा असतो. एखाद्या नेत्याच्या मित्रांनी केलं म्हणजे त्याचा काहीतरी दोष असतो असं नाही ते तपासामध्ये सगळं समोर येईल म्हणून मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो. धनंजय मुंडे यांचा त्यामध्ये कोणताही संबंध नसावा, हे मला वाटतं असं म्हणत दत्तात्रय भरणे यांनी धनंजय मुंडे यांचे पाठराखण केली आहे.
धनंजय मुंडेंचा कुठलाही संबंध असण्याची शक्यता नसावी
दरम्यान, वाल्मिक कराडच्या मुसक्या आवळल्याने धनंजय मुंडेच्या अडचणी वाढल्याची चर्चा असतानाच क्रीडा खात्याचा पदभार अजूनही न स्वीकारलेले मंत्री दत्तामामा भरणे यांनी त्यांची पाठराखण केली आहे. अनेक मंत्र्यांचे मित्र असतात त्यांनी गुन्हा केला म्हणून मंत्र्यांवर आरोप करणे कितपत योग्य? अशी विचारणा भरणे यांनी केली आहे. बीड प्रकरणात धनंजय मुंडे यांचा कुठलाही संबंध असण्याची शक्यता नसावी, असेही ते म्हणाले.
दरम्यान, धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरून हटवण्याची मागणी होत आहे. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून हटवण्याचे निर्देश देण्याची विनंती करणारी याचिका सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या प्रकरणाच्या निष्पक्ष तपासासाठी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने धनंजय मुंडे यांना मंत्रीपदावरून हटवण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती याचिकेत केली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये भूमिका बजावणाऱ्या बीडमधील गुन्हेगारी टोळीच्या प्रमुखाशी मुंडेंचा संबंध असल्याचा दावा याचिकाकर्त्याने केला आहे. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने त्यांची याचिका स्वीकारावी, अशी विनंती याचिकाकर्त्याने केली.