पुणे: होळकरांच्या यशाचा जागता इतिहास असणाऱ्या पुण्यातील किल्ले वाफगावच्या संवर्धनाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या किल्ल्याच्या संवर्धनासाठी पहिल्या टप्प्यातील 7.20 कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. यासाठी होळकरांचे वंशज भूषणसिंहराजे होळकर (Bhushansiha Raje Holkar) यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना यश आलं. 


हिंदवी स्वराज्याच्या सीमा अटकेपार नेण्यामध्ये होळकर घराण्याचे मोलाचे योगदान आहे. या पराक्रमी होळकर घराण्याचे वाफगाव (ता. खेड, जिल्हा- पुणे) हे मूळ गाव. सुभेदार मल्हारराव होळकर यांनी वाफगावला भव्य भुईकोट किल्ला उभारला. भारतीय स्वातंत्र्याचे प्रणेते महाराजा यशवंतराव होळकर (प्रथम) ज्यांची तुलना फ़्रान्सच्या नेपोलियनशी होते, यांचा जन्म याच किल्ल्या मधे 3 डिसेंबर 1776 रोजी झाला.


या किल्ल्याला 7 भव्य दगडी बुरुज असून मुख्य किल्ल्यामध्ये भव्य प्रवेशद्वार, राणी महाल, विष्णू पंचायतन, बुरुजातील विहीर, राजसदर, पश्चिम द्वार, भूमिगत खलबतखाने, होळकर कालीन तोफा अशा अनेक सुंदर वास्तू आज ही होळकरशाहीची साक्ष देत दिमाखात उभ्या आहेत. सध्या किल्ल्यामध्ये रयत शिक्षण संस्थेची शाळा आहे.


किल्ल्याचं संवर्धन व्हावं ही लोकभावना 


किल्ल्याचे जतन संवर्धन व्हावे, ही लोक भावना आहे. यामुळे वाफगाव व परिसराचा विकास होईल, येणाऱ्या पिढ्याना तो प्रेरणा देत राहावा यासाठी होळकर घराण्याचे वंशज भूषणसिंहराजे होळकर हे अनेक वर्षांपासून प्रयत्न करत होते. ते स्वतः वास्तू विशारद असून किल्ल्याच्या जीर्णोद्धाराचा आराखडा त्यांच्या टीमने तयार केला आहे.


भूषणसिंहराजेंच्या या प्रयत्नाला यश आले आहे. उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजीत पवार यांनी किल्याच्या संवर्धनासाठी लागेल तेवढा निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. आता संवर्धन कार्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये 7.20 कोटीचा निधी मंजूर झाला असून त्याचे टेंडरही निघाले आहे. यामुळे वाफगाव किल्ल्याच्या संवर्धनाचा मार्ग आता मोकळा आहे. येत्या 6 जानेवारीला महाराजा यशवंतराव होळकर (प्रथम) यांचा राज्याभिषेक दिन किल्ले वाफगाव येथे परंपरेप्रमाणे साजरा होणार आहे. तेव्हापासून संवर्धन कामाला सुरवात होणार असल्याचे राजेंनी सांगितले. 


शरद पवार आणि अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या रयत संस्थेच्या मीटिंगमध्ये या संवर्धन कार्यास मंजुरी दिली आहे. किल्ल्यामधील शाळाही लवकर स्थलांतरीत करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. पण तोपर्यंत विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होऊ न देता शाळेच्या वापरातील इमारती वगळून संवर्धन कार्यास सुरवात करण्यात येणार आहे.


किल्याचे ऐतिहासिक महत्व आणि जनभावना लक्षात घेऊन अजित पवारांनी या कार्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल भूषणसिंहराजेंनी त्यांचे आभार मानले. या कार्यासाठी वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या मंत्री हसन मुश्रीफ, खेडचे आमदार दिलीप मोहिते, पुरातत्व खात्याचे सहायक संचालक विलास वहाने, वाफगाव ग्रामस्थांचेही आभार मानले आहेत.


ही बातमी वाचा: