मुंबई: विरोधी पक्षातील काही नेत्यांना श्रीखंड तर काहींना पिठलं भाकरी मिळाली, काही ठराविक मोठ्या नेत्यांनाच निधी मिळाला तर 90 टक्के आमदारांना निधीच मिळाला नसल्याची तक्रार राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केली. विरोधी पक्षाच्या ज्या नेत्यांना निधी मिळाला आहे त्यांनी तो घेऊ नये, एकत्रित राहायचं आहे तर सर्वांनी एकसारखं वागाययला हवं असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी सरकारकडून निधी मिळवणाऱ्या विरोधी पक्षातील काही प्रमुख नेत्यांना सुनावलं. त्यावर आपण निधीसाठी कोणत्याही मंत्र्याकडे गेलो नव्हतो असं विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले. 


राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, नाना पटोले या चार नेत्यांना सरकारकडून मतदारसंघासाठी मोठा निधी मिळाला असल्याची चर्चा आहे. त्यामुळे नाव न घेता जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या उपस्थितीत खडे बोल सुनावल्याची चर्चा आहे. जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यांतर विजय वडेट्टीवारांनी त्याला उत्तर दिलं.  त्यामुळे विरोधकांमध्ये निधीच्या प्रश्नावरून धुसमूस असल्याची चर्चा आहे. 


विरोधी पक्षातील काहींना श्रीखंड तर काहींना पिठलं भाकरी


जितेंद्र आव्हाड म्हणाले की, "आमदारांना निधी न मिळणे हे दुर्दैवी आहे. विरोधी पक्षातील 90 टक्के आमदारांना निधी मिळाला नाही. मात्र विरोधी पक्षातील काही प्रमुख नेत्यांना निधी देण्यात आला. आम्ही प्रमुख नेते नाही म्हणून आम्हाला निधी मिळाला नाही. प्रमुख नेत्यांना निधी देणे आणि इतर आमदारांना निधी न देणे अन्यायकारक आहे. प्रमुख नेत्यांनीही तो निधी घ्यायला नको होता, त्यांनी तो नाकारायला हवं होतं मात्र त्यांनी तसं केलं नाही. एकत्रित राहायचं असेल तर सर्वांनी एकसारखं वागायला हवं. काहींना पिठलं भाकरी आणि काहींनी श्रीखंडाचा जेवण जेवण योग्य नाही."


जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, मला माझ्या मतदारसंघासाठी 25 कोटी मिळाले. मात्र ते मागण्यासाठी मी कुठल्याही मंत्र्याकडे गेलो नव्हतो. रस्त्याच्या कामासाठी मला ते पैसे मिळाले. इतरांना माझ्यापेक्षा जास्त पैसे मिळाले.


अधिवेशन जनतेसाठी आहे हे सरकार हेच विसरले. विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याचा अभ्यासही यांच्या मंत्र्यांचे नव्हते. एकंदरीत दिल्लीची पद्धत महाराष्ट्रात येत आहे. ही हुकूमशाही पद्धती असून यांना विरोधक ठेवायचे नाही असं विजय वडेट्टीवार म्हणाले.  


राज्य सरकारवर टीका करताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, "कंत्राटदारांना दिवाळीत पैसे दिले जायचे, मात्र आता कंत्राटदारांना संप करावे लागले. महाराष्ट्राची आर्थिक स्थिती एवढी खालावली नव्हती. या तिघांच्या भांडणात महाराष्ट्राचे नुकसान होत आहे. यांच्या रुसवारुसवीमध्ये नुकसान होत आहे. मुख्यमंत्र्यांचा वेळ या नेत्यांची समजूत घालण्यामध्ये जात आहे. ट्रिपल इंजिनचे सरकार महाराष्ट्राचे नुकसान करत आहे."


ही बातमी वाचा: