पुणे: राज्यात आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी दंड थोपटले जाऊ लागले आहेत, काही पक्षांनी तर आपले उमेदवार देखील जाहीर करण्यास सुरूवात केली आहे. आणखी जागा वाटप, चर्चा, बैठका यांना सुरूवात होण्याआधीच पुण्यात मात्र विश्वजीत कदम यांनी सांगली पॅटर्नचा उल्लेख करत जागा न मिळाल्यास आपला पॅटर्न राबवू असं म्हणत शड्डू ठोकला आहे.


लोकसभेतील सांगली पॅटर्न विधानसभेवेळी जुन्नरमध्ये राबवू, असे सूतोवाच विशाल पाटलांना खासदार बनविणारे पायलट विश्वजित कदम यांनी दिले आहेत. सांगलीत उद्धव ठाकरेंनंतर विश्वजित कदम आता थेट शरद पवारांना ते ही राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात शह देणार का? अशी चर्चा राज्यभर रंगू लागली आहे. यानिमित्ताने जुन्नरमधील काँग्रेसचे इच्छुक उमेदवार सत्यशील शेरकरांच्या राजकीय हालचालींकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. महाविकास आघाडीत जुन्नर विधानसभा ही शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सुटणार हे उघड आहे. मात्र त्याचं जुन्नरमधून काँग्रेसचे नेते सत्यशील शेरकर ही तीव्र इच्छुक आहेत, त्यांच्यासाठीच विश्वजित कदमांनी शड्डू ठोकले आहेत.


शेरकरांसाठी सांगली अथवा नवा पॅटर्न राबविण्याची तयारी विश्वजित कदमांनी दर्शवली आहे. पुण्यात दोन दिवसांपूर्वी पार पडलेल्या काँग्रेसच्या बैठकीत कदमांनी शेरकरांना तसा शब्द ही दिला आहे. त्यामुळं उद्धव ठाकरेंप्रमाणेचं शरद पवारांविरोधात ही काँग्रेस इथं ही बंडखोरी करणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. तूर्तास तरी शेरकरांनी त्यांचा पत्ता खुला न करता, मविआ नेत्यांकडे बोट दाखविलेला आहे. 






तर एबीपी माझाशी बोलताना काँग्रेसचे नेते सत्यशील शेरकर म्हणाले की, विश्वजीत दादांनी म्हटलं सत्यशील तू आमदार झाला पाहिजे, तूझ्यासाठी कोणताही पॅटर्न राबवायला लागला तरी चालेल. पण तू आमदार झाला पाहिजे. विशेषत: सांगली पॅटर्न राबवू आपण, असं त्यांनी म्हटलं आहे. पण महाविकास आघाडीचा जो निर्णय असेल तो मान्य करून आपल्याला पुढे जावे लागेल असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. त्याचबरोबर जो निर्णय महाविकास आघाडी घेईल तो निर्णय आम्हाला मान्य असणार आहे, असंही सत्यशील शेरकर म्हणाले आहेत. 


विश्वजीत कदम काय म्हणाले?


सत्यशील शेरकर आणि विश्वजीत कदम यांच्यामध्ये बातचीत सुरू असताना सत्यशील शेरकर यांना उद्देशून विश्वजीत कदम म्हणाले, "नाहीतर मग थेट सांगली पॅटर्न, तुझ्यासाठी कोणताही पॅटर्न राबवू... नाहीतर मग तुझ्यासाठी मग नवा पॅटर्न काढू.... आम्ही केले की धाडस", असं म्हणत विश्वजीत कदम आणि सत्यशील शेरकर यांच्या या संवादाचा व्हिडिओ सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.