पुणे: पुण्यात शिवसेना ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात येत आहे. काल(बुधवारी) मालवण येथे काल ठाकरे आणि राणेंमध्ये जो राडा झाला. यानंतर राणे यांनी धमकी दिली. त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पुण्यात आंदोलन करत आहे. संपूर्ण घटनेबाबत सरकारचा निषेध आणि राणेंना जोडे मारो आंदोलन शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने करण्यात येत आहे. बालगंधर्व रंगमंदिर चौकात हे आंदोलन होत आहे. यावेळी जमलेल्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली, रस्त्याच्या मधोमध बसून हे आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी नारायण राणेंना अटक करा अशी मागणीही करण्यात आली आहे. महाराजांच्या गडकिल्ल्यांचा सातबारा राणेंच्या बापाचा नाही असं म्हणत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राणेंवर टीकास्त्र सोडलं आहे.


यावेळी बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, राज्यात जी ठोकून काढण्याची भाषा केली जाते. कायदा सुव्यवस्था हातात घेतला जातो, नारायण राणेंकडून उद्दामपणाची आणि गुंडगिरीची भाषा केली जाते. पत्रकारांच्या हातातले बूम काढून घेतले जातात. त्यामुळे नारायण राणेंवर सामाजिक शांतता बिघडवण्यासाठी चिथावणीखोर वक्तव्ये केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले पाहिजेत. शांतता भंग करण्याचा गुन्हा नारायण राणेवर दाखल झाला पाहिजे, तर नारायण राणेंना अटक झाली पाहिजे, म्हणून आम्ही अल्टीमेटम देण्यासाठी हे आंदोलन करत आहोत असंही यावेळी सुषमा अंधारेंनी सांगितलं आहे. 


तर नारायण राणेंनी काल जी भाषा वापरली ती त्यांच्या संस्काराचा भाग आहे, त्यांनी त्यांचे संस्कार आणि इतिहास दाखवला आहे, त्यांनी काल बूम ओढला, पत्रकारांशी असभ्य वागणं, पोलिसांना दमदाटी करणं, हे सर्व कायदा आणि सुव्यवस्था विस्कळीत करण्याचा प्रयत्न केला हा प्रकार दस्तुरखुद्द देवेंद्र फडणवीसांमुळे सुरू आहे. नारायण राणे आणि त्यांचे पुत्र हे कळसुत्री बाहुल्या आहेत. त्यांचे मुख्य सुत्रधार हे फडणवीस आहेत, त्यांची इच्छा आहे का महाराष्ट्रात कायम सांप्रदायिक विभाजन झालं पाहिजे, महाराष्ट्र कायम अशांत राहिला पाहिजे. फडणवीस नावच्या सुत्रधाराने उत्तर देण्याची गरज आहे. नारायण राणेंना फक्त राज्य अशांत करण्यासाठी ठेवलं आहे का असा सवाल देखील यावेळी सुषमा अंधारेंनी उपस्थित केला आहे. 


तर काल नारायण राणे म्हणाले, इकडं यायचं नाही, शिवाजी महाराजांनी बांधलेल्या गड-किल्ल्यांचा हा नारायण राणेंच्या बापाचा नाही. हा सातबारा महाराष्ट्राच्या बापाचा आहे, त्यामुळे नारायण राणेंवर गुन्हा दाखल करण्यात यावे आणि ही जबाबदारी फडणवीसांची आहे, जर ते गुन्हे दाखल करणार नसतील तर हे स्पष्ट दिसेल की, ते त्यांच्या हातच्या बाहुल्या आहेत असंही पुढे अंधारेंनी म्हटलं आहे.