Pune Crime News: सामूहिक बलात्कारप्रकरणी उत्तर प्रदेशातील माजी आमदाराच्या मुलाला पुण्यात अटक
वाराणसीतील एका गायिकेने विजय मिश्रा आणि त्याचा मुलगा विष्णू मिश्रा यांच्यासह तिघांवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. या दोन्ही घटनांमध्ये फरार विष्णू मिश्राचा पोलीस त्याचा शोध घेत होते
Pune Crime News: उत्तर प्रदेशातील (Uttar pradesh) तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी समाजवादी पक्षाच्या माजी आमदाराच्या मुलाला वाराणसी आणि पुणे शहर पोलिसांनी अटक केली आहे. विष्णू विजय मिश्रा (Vishnu Vijay Mishra) असं 34 वर्षीय अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी हा हडपसर परिसरातील उच्चभ्रू सोसायटीत राहत होता. उत्तर प्रदेश पोलिसांनी फरार आरोपींची माहिती देणाऱ्याला एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
विष्णू मिश्रा यांचे वडील विजय मिश्रा उत्तर प्रदेशातील भदोहीचे आमदार होते. मिश्राचा सामूहिक बलात्कार प्रकरणात सहभाग असल्याचे तपासात उघड झाले. त्यानंतर उत्तर प्रदेश पोलिस त्याचा शोध घेत होते. तपासादरम्यान मिश्रा यांचे नातेवाईक पुण्यात राहत असल्याची माहिती विशेष तपास पथकाला मिळाली. दहा दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश पोलिसांचे विशेष पथक पुण्यात दाखल झाले. त्यानंतर पोलीस पथकाने हडपसर पोलिसांच्या मदतीने मिश्राला अटक केली. त्याला लष्करी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला ट्रान्झिट रिमांड मंजूर केला. त्यानंतर पोलिसांचे पथक त्याच्यासोबत उत्तर प्रदेशला रवाना झाले.
काय होतं प्रकरण?
भदोही जिल्ह्यातील गोपीगंज कोतवालीमध्ये सुमारे दोन वर्षांपूर्वी बाहुबली आमदार विजय मिश्रा यांचे नातेवाईक कृष्ण मोहन यांनी घर आणि फर्मचा ताबा मिळवून फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. यामध्ये विजय मिश्रा, त्यांचा मुलगा विष्णू आणि त्यांच्या पत्नीला आरोपी करण्यात आले होते. याच प्रकरणात ऑगस्ट 2020 मध्ये विजय मिश्रा यांना मध्य प्रदेशातील माळवा येथून अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले आणि तेव्हापासून त्यांचा मुलगा फरार होता.
वाराणसीतील एका गायिकेने विजय मिश्रा आणि त्याचा मुलगा विष्णू मिश्रा यांच्यासह तिघांवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. या दोन्ही घटनांमध्ये फरार विष्णू मिश्राचा पोलीस त्याचा शोध घेत होते, मात्र त्यांना यश येत नव्हते. विष्णूच्या अटकेसाठी पोलिसांनी अनेकवेळा छापे टाकले मात्र त्यात यश न आल्याने बक्षिसाची रक्कम 25 हजारांवरून एक लाख करण्यात आली.