Vanraj Andekar: राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर (Vanraj Andekar) यांच्या हत्येनंतर पुन्हा एकदा पुण्यात खळबळ उडाली आहे. रविवारी सायंकाळी पुण्यातील नाना पेठे येथे वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार करून त्याचबरोबर कोयत्याने वार करण्यात आला. जवळपास 12-13 जणांची वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला केल्याचं सीसीटिव्हीच्या माध्यमातून समोर आलं आहे. सदर प्रकरणी पुणे पोलिसांनी अनेकांना ताबयात घेतलं आहे. या घटनेनंतर आंदोकर यांच्या बहीण, मेहुणा, भाचा यांच्यासह 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. प्रथमदर्शी ही हत्या कौटुंबिक वादातून केल्याचं समोर आलं मात्र, आता या घटनेबाबच अनेक नवनवीन खुलासे समोर येऊ लागले आहेत.
आंदेकरांच्या हत्येला कौटुंबिक वादाची पार्श्वभूमी दिसत असली, तरी यामागे आणखी काही गोष्टींची चर्चा सुरू आहे, ती म्हणजे आंदेकर टोळीतील फूट आणि नाना पेठेतील साम्राज्याच्या वर्चस्वापर्यंत पोहचत आहेत. आंदेकर टोळीला पाच दशकांचा मोठा रक्तरंजित इतिहास आहे.
...म्हणून झाला गेम?
आंदेकरांच्या हत्येला कौटुंबिक वादाची पार्श्वभूमीसोबतच आता सोमनाथ गायकवाडशी संबध जोडला जात आहे. सोमनाथ गायकवाड हा कारागृहातून एप्रिल 2024 मध्ये जामिनावर बाहेर आला. आंदेकर टोळीत आणि त्याच्यामध्ये धुसफूस सुरू होती. सोमनाथ गायकवाडला भीती होती की, आंदेकर टोळी आपला गेम करणार. त्यामुळे आपल्याला जिवंत राहायचंय, तर आंदेकर टोळीचा मुख्याला ठोकला पाहिजे, असे त्याने ठरवलं. गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून त्याने याबाबत आखणी करण्यास सुरुवात केली.
अखेर रविवारी रात्री संधी मिळताच सोमनाथच्या पंटरांनी वनराज आंदेकरांचा गेम केला. पुण्याच्या गुन्हेगारी विश्वात आंदेकर टोळीचा दबदबा आहे. मात्र या गुन्हेगारीपासून लांब अशी वनराज आंदेकरांची ओळख आहे. वनराज आंदेकर राजकीय क्षेत्रात सक्रिय होते. राष्ट्रवादी पक्षाकडून ते नगरसेवकदेखील झाले होते. मात्र पूर्ववैमन्स, कौटुंबिक कलह, संपत्तीवरून वनराज यांच्या खुनाचे प्राथमिक कारण आहे.
वनराज आंदेकर यांच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, कौटुंबिक वादातून हत्या झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, यामागे टोळीचा संघर्ष असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली होती. यातील एक आरोपी सोमनाथ सयाजी गायकवाड हा आंदेकर टोळीचा प्रतिस्पर्धी होता. त्याची स्वतःची टोळी आहे, तो मोक्कातंर्गत जामिनावर बाहेर आहे. स्वतः सोमनाथ आणि टोळीतील काही सदस्य आंदेकर टोळीच्या रडारवर होते अशी माहिती आहे. यामुळे आपल्याला आणि आपल्या टोळातील सदस्यांना काही होण्याआधी त्यानी आंदेकर टोळीला धडा शिकवू या विचाराने त्यानी आंदेकरांचा गेम केला का? याची तपासणी केली जात आहे. पोलिसांनी सध्या सोमनाथ गायकवाडला चौकशीसाठी ताब्यात घेतलेलं आहे.
आंदेकर हत्या प्रकरणानंतर पुणे पोलिसांची 20 पथके हल्लेखोरांच्या शोध घेत आहेत. आतापर्यंत 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर हल्लेखोरांनी पिस्तुलातून पाच राउंड फायर केले होते. त्यापैकी एक गोळी मिसफायर झाली. त्यानंतर वनराज यांच्यावर कोयत्याने वार केले गेले. त्यात शरीरावर 12 ठिकाणी जखमा झाल्या होत्या. कौटुंबिक संपत्तीच्या वादातून ही हत्या घडवून आणण्यात आली आहे.
नेमकी घटना काय?
नाना पेठेत 14 ते 15 हल्लेखोर दुचाकी घेऊन आले. यावेळी एका मित्रासोबत उभे असलेले वनराज आंदोरकर यांच्या अंगावर धावून जात गोळीबार करण्यास सुरुवात केली. काहीजण कोयता घेऊन त्यांच्या अंगावर गेले. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार वनराज आंदेकर यांना पाच राऊंडपैकी एक देखील गोळी लागली नाही. मात्र गोळीबारानंतर त्यांच्यावर धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आला त्यात वनराज आंदेकर यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. सदर घटनेनंतर वनराज आंदेकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.