पुणे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने सर्वच ठिकाणी शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मोठा प्रश्न उभा राहिला. यावर उपाय म्हणून शहरांमध्ये ऑनलाईन माध्यमांचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो आहे. त्यासाठी शहरांमध्ये संसाधनंही उपलब्ध होताना दिसत आहे. मात्र, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या पालकांची आर्थिक परिस्थिती पाहता महागड्या ऑनलाईन शिक्षणाचे पर्याय परवडणारे नाहीत. हीच गरज ओळखून ‘वॉवेल्स ऑफ द पिपल असोसिएशन’ (वोपा) या संस्थेने अशा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी मोफत व्ही स्कूलचा (V School) उपक्रम सुरु केला आहे. (V School online education platform).


व्ही स्कूल (VSchool) प्लॅटफॉर्ममुळे राज्यभरातील दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन शिक्षण घेणं शक्य होत आहे. बीड जिल्हा प्रशासन आणि वोपा यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम विकसित करण्यात आला आहे. यामुळे आतापर्यंत लाखो विद्यार्थ्यांना कोरोनाच्या काळातही आपलं दहावीचं शिक्षण सुरु ठेवता आलं.


ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी आवश्यक असलेली वीज, मोबाईल अशा गोष्टींची उपलब्धता हा मोठा प्रश्न आहे. शिवाय ऑनलाईन शिक्षणाचे महागडे ॲप सामान्य विद्यार्थी व पालकांना परवडू शकत नाहीत, परिणामी असे विद्यार्थी भविष्यातील स्पर्धेत मागे पडतील. पण असे होऊ नये म्हणून बीड जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी राहूल रेखावर आणि अजित कुंभार यांच्या मदतीने पुण्यातील वॉवेल्स ऑफ द पिपल असोसिएशन (वोपा) या सामाजिक संस्थेने विविध तज्ज्ञ शिक्षकांच्या मदतीने राज्यातील सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत शैक्षणिक प्लॅटफॉर्म सुरु केला.


ठळक वैशिष्ट्ये :




  • ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन निर्मिती

  • हा प्लॅटफॉर्म कुठल्याही मोबाईलमधील कोणत्याही इंटरनेट ब्राऊजरमध्ये उघडेल

  • फक्त व्हिडिओचा भडिमार नाही, तर फोटो, जीआयएफ आणि इतर रंजक गोष्टींचाही उपयोग

  • एकाच मोबाईलवरुन अनेक विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याची सुविधा (लॉगिन किंवा इंस्टॉल करण्याची गरज नाही)

  • शाळा व शिक्षक यांना यात सक्रिय भूमिका

  • वापरायला एकदम सोप्पे (एक धडा एका पानावर – स्क्रोलिंग)

  • वही, पेन, पुस्तक, परिसर व शिक्षक यांचा योग्य वापर करुन विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाईम कमी होईल अशी रचना


व्ही स्कूल (VSchool) प्लॅटफॉर्म कसा वापराल?

  • तुमच्या मोबाईलच्या कुठल्याही ब्राऊझरमध्ये ssc.vopa.in असं टाईप करा.

  • तुम्हाला व्ही स्कूल ऑनलाईन शिक्षणाचा प्लॅटफॉर्म दिसेल. येथे तुम्हाला ज्या विषयाचा अभ्यास करायचा आहे त्याचे नाव आणि पाठाचा क्रमांक निवडा.

  • पाठ निवडल्यानंतर काही क्षणात तुम्हाला तो संपूर्ण धडा एकाच पानावर खाली स्क्रोल करून पाहता येईल.

  • तुमच्या सोयीसाठी प्रत्येक धड्याला काही कृतिसंचांमध्ये विभागले आहे. एका कृतिसंचात तुमच्यासाठी काही सूचना, व्हिडीओ, इमेजेस, ऑनलाईन परीक्षा, घरी करायला गृहपाठ इ. गोष्टी असतील.

  • तुम्ही रोज कोणत्या विषयाचे आणि किती कृतीसंच पूर्ण करायचे हे तुम्ही तुमच्या शाळेतील शिक्षकांनाही विचारू शकतात.

  • तुम्हाला कोणताही व्हिडीओ पाहण्याआधी किंवा कृती करण्याआधी दिलेल्या सूचना लक्ष देऊन वाचा.

  • यामध्ये तुम्हाला काही अभ्यास ऑनलाईन टेस्टच्या स्वरुपात असेल, ज्याचे गुण तुम्हाला लगेच समजतील आणि कुठे चुकले हे देखील समजेल. टेस्ट देऊन झाल्यावर शो रिझल्टवर क्लिक करा. काही गृहपाठ हा वहीवर करून तुमच्या शिक्षकांना व्हॉट्सपवर पाठवा आणि त्यांचाही अभिप्राय घ्या.

  • प्रत्येक धड्याच्या शेवटी तुम्हाला Exit Slip (तुमचा अभिप्राय/ फीडबॅक) भरुन देता येईल.

  • एखादे पेज व्यवस्थित लोड झाले नाही, एखादा फोटो नीट दिसत नसेल तर पेज रिफ्रेश (लोड) करा.

  • तुम्ही एखादी इमेज/ आकृती/ नकाशा दोन बोटांनी झूम करून पाहू शकता.


नेहमी व्हिडीओ फुल स्क्रीन मोड मध्ये पहा.


या उपक्रमाविषयी सांगताना वोपा संस्थेचे प्रमुख प्रफुल्ल शशिकांत म्हणाले, “ग्रामीण भागात नवीन फोन किंवा डिजीटल साधनं विकत घेऊन देता येतील अशी अनेक पालकांची परिस्थिती नाही. मग अशा परिस्थितीत त्यांचे शैक्षणिक नुकसान टाळता यावे याचा विचार करुन या प्लॅटफॉर्मची निर्मिती केली आहे. ऑनलाईन प्लॅटफॉर्म म्हणजे शिक्षण नव्हे तर ते शिक्षण पोहोचवण्याचे साधन आहे.”


ऑनलाईन शिक्षण कसे दिले जावे? केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून डिजिटल शिक्षणासंबंधी गाईडलाइन्स जारी


राज्यात दहावीची एकूण 15-18 लाख विद्यार्थी आहेत. या सर्वांना या उपक्रमाचा थेट फायदा होणार आहे. मागील एका महिन्यात या प्लॅटफॉर्मला भेट देणाऱ्यांची संख्या जवळपास 20 लाख झाली आहे. तसेच भेट देणाऱ्यांची संख्या 2 लाखापेक्षा अधिक आहे.


व्ही स्कूल हा सहकारी पद्धतीचा प्लॅटफॉर्म सुरु करण्याचा हेतू


दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत शिक्षणाचा ऑनलाईन प्लॅटफॉर्म सुरु करण्याचं कारण सांगताना वोपाचे संचालक आकाश भोर म्हणाले, “बाजारातील ऑनलाईन शिक्षणाची चांगली साधने प्रती विद्यार्थी 20-50 हजार रुपये शुल्क देऊन घ्यावी लागतात. त्यामुळे ज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे असेच विद्यार्थी या प्रकारचं ऑनलाईन शिक्षण सुरु ठेऊ शकतील किंवा त्यांचे पालक त्यांना घरी शिकवतील. त्याचवेळी ज्या विद्यार्थ्यांचे पालक सुशिक्षित नाहीत, पोटापाण्याच्या प्रश्नात अडकलेले आहेत, त्यांच्या पाल्यांना कुठलेही मार्गदर्शन नसेल. शासनाची शाळा सोडली, तर शिकण्याची इतर कुठलीही साधने नसतील.”


“काही महिन्यानंतर शाळा सुरु होतील. दहावी (SSC), बारावी (HSC), सीईटी (CET) इ. परीक्षा काही कालावधीत या दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांना द्याव्या लागतील. या गुणांवर अवलंबूनच विद्यार्थ्यांना चांगलं वाईट कॉलेज मिळणार आहे. त्यानुसार शिक्षण मिळणार, त्यानुसार आयुष्याचे पर्याय समोर येणार. म्हणजेच अख्ख्या एका पिढीची शिक्षणातून चांगले आयुष्य जगण्याची न्याय्य संधी व्यवस्थेने हिरावून घेतलेली असेल. या जाणिवेने आम्ही प्रचंड अस्वस्थ झालो,” असं मत वोपाच्या संचालक ऋतुजा सीमा महेंद्र यांनी व्यक्त केलं.


Majha Vishesh | आठवीच्या पुस्तकात चूक, भगतसिंह, राजगुरुंसह कुर्बान हुसेन फासावर गेल्याचा उल्लेख