पुणे : भारताच्या वैद्यकीय क्षेत्रात लवकरच इतिहास घडणार आहे. गर्भाशय प्रत्यारोपण शास्त्रक्रियेनंतर देशातीलच नव्हे तर आशिया खंडातील पहिल्या बाळाचा पुण्यात जन्म होणार आहे.

आपल्या बाळाची प्रत्येक हालचाल एका आईलाच जाणवते आणि ती टिपणं हा कुठल्याही स्त्रीच्या आयुष्यातला एक अविस्मरणीय आनंद असतो. आठ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर मिनलच्या (नावं बदलली आहेत) आयुष्यात हे क्षण आले आहेत.

गर्भाशय अशक्त असल्यामुळे मिनलला गर्भधारणा होत नव्हती. मात्र गर्भशाय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर तिला ही अनुभूती घेता येणार आहे. पुण्यातील गॅलेक्सी केअर हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या टीममुळे तिचं स्वप्न प्रत्यक्षात अवतरणार आहे. मिनल आता सात महिन्यांची गर्भवती आहे.

18 मे 2017 रोजी पुण्यातल्या गॅलेक्सी केअर हॉस्पिटलमधल्या 17 डॉक्टरांच्या टीमने इतिहास घडवला आणि भारतातली पहिली गर्भाशय प्रत्यारोपणाची यशस्वीपणे पार पाडली. सात महिने पूर्ण होणं हा गर्भारपणातला एक मोठा टप्पा मानला जातो.

येणाऱ्या बाळाच्या स्वागताची जितकी मीनल आणि तिचा पती रमेशला प्रतीक्षा आहे, तितकीच भारतातल्या वैद्यकीय क्षेत्रालाही आहे. कारण गर्भाशय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेतून जन्माला येणारं हे देशातीलच नव्हे, तर आशिया खंडातील पहिलंच बाळ आहे. विशेष म्हणजे जगातील अशा प्रकारचं फक्त नववं बाळ असल्याचा दावाही रुग्णालयाकडून करण्यात आला आहे.

मिनल आणि रमेशने गर्भाशय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. पण पुढचा प्रश्न होता तो म्हणजे की, गर्भाशय दान कोण करणार? मग मिनलचीच आई पुढे आली आणि तिने आपल्या मुलीला गर्भाशय दान केलं. ज्या गर्भशयात मिनल वाढली त्याच गर्भाशयात आता मिनलचं बाळही वाढत आहे.

गॅलेक्सी केअर हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर डॉ. शैलेश पुणतांबेकर यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांच्या टीमने हे देशातलं पहिलं गर्भशय प्रत्यारोपण यशस्वी करुन दाखवण्याचं आव्हान लीलया पेललं. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यनंतर ती गर्भवती होणं हेही एक आव्हान डॉक्टरांसमोर होतं. आयव्हीएफ या तंत्राच्या सहाय्याने हे शक्य झालं.

आता नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मिनलचं सिझेरियन करुन प्रसुती करण्यात येणार आहे. अर्थात याकडे आता सगळ्यांचेच डोळे लागले आहेत.