सोशल मीडियावर हाय, हॅलो करणाऱ्या चाहत्यांना प्राजक्ता माळीचा नवा टास्क
एबीपी माझा वेब टीम | 24 Sep 2018 01:29 PM (IST)
गणेश विसर्जनानंतर प्रदूषण टाळण्यासाठी राज्यभरात स्वच्छता मोहिम राबवण्यात येत आहे. सेलिब्रिटीही यामध्ये सहभाग घेत आहेत. पुण्यात प्राजक्ता माळीने या मोहिमेत सहभाग घेतला.
पुणे : गणेश विसर्जनानंतर राज्यात विविध ठिकाणी स्वच्छता मोहिम राबवण्यात येत आहे. पुण्यात आय मेक माय पुणे या संस्थेतर्फे टिळक रस्ता, स्वारगेट आणि अलका चौकात स्वच्छता मोहिम राबवण्यात आली. अभिनेत्री प्राजक्ता माळीनेही या मोहिमेत सहभाग घेतला आणि स्वच्छता केली. प्राजक्ता माळीने आपल्या सर्व चाहत्यांना या मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं. सोशल मीडियावर फोटो पाहून फक्त हाय, हॅलो करण्यापेक्षा काहीतरी चांगल्या कामात सहभागी व्हावं म्हणून चाहत्यांनाही या मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं, असं तिने एबीपी माझाशी बोलताना सांगितलं. नाशिकमध्येही स्वच्छता गणेश विसर्जनानंतर नाशिक शहरातील गोदाघाट परिसर चकाचक झालाय. महापालिका कर्मचाऱ्यांनी रात्रीतूनच गोदा घाटसह शहरातील प्रमुख विसर्जन स्थळांची साफसफाई केल्याने गोदेचं प्रदूषण टळलं आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबरोबरच विसर्जनही पर्यावरणपूरकच झाले पाहिजे या आवाहनाला नाशिककरांनी चांगला प्रतिसाद दिला. मात्र त्यातूनही गोदावरी नदीसह इतर ठिकाणी साचलेला कचरा कर्मचाऱ्यांनी साफ केला. महापालिका आयुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांना सूचना केल्या होत्या. त्यानंतर गेल्या अनेक वर्षात पहिल्यांदाच अशा पद्धतीने परिवर्तन बघायला मिळालं. ठाण्यात स्वच्छतेसाठी खास मशिन ठाण्याजवळच्या पारसिक बोगद्याजवळील परिसर हा सर्वात अस्वच्छ परिसर म्हणून ओळखला जातो. मात्र तो परिसर स्वच्छ करण्यासाठी आता ठाणे महानगरपालिका आणि मध्य रेल्वेने स्वच्छ करण्याचं ठरवलं आहे. त्यासाठी स्पेशल मशिन आता चालवण्यात येत आहे. उतार असेल तरी हे मशिन 360 डिग्री फिरुन काम करू शकतं. जेसीबी मात्र असं करू शकत नाहीत. त्यामुळे पारसिक परिसर स्वच्छ होण्यास मदत होईल, अशी आशा आहे.