पुणे : राज्यातील पर्यटकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे.जर तुम्ही मान्सून ट्रिप (Monsoon Trip) प्लान करत असाल तर थांबा कारण भूमी डॅम, ताम्हिणी घाट (Tamhini Ghat) येथे घडलेल्या घटनेनंतर पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी पुण्यातील आठ तालुक्यातील पर्यटनस्थळांवर जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. यामध्ये मावळ, मुळशी, हवेली, आंबेगाव, खेड, जुन्नर, भोर वेल्हा या ठिकाणी पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदीचे आदेश दिले आहेत. अपघात टाळण्यासाठी आणि या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांचा सुरक्षिततेच्यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिले आहे.
पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी तसेच अपघाताचा संभाव्य धोका लक्षात घेता कलम 144 नुसार जिल्ह्यातील गडकिल्ले, धरण, तलाव , धबधबे आदी पर्यटनस्थळ प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. भुशी डॅम आणि प्लस व्हॅलीतील दोन दुर्घटनेनंतर जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहे. आठ तालुक्यांतील गड-किल्ले, पर्यटनस्थळे, धरणे, धबधबे अशा ठिकाणी पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे, खोल पाण्यात उतरणे आणि त्यामध्ये पोहण्यावर बंदी, धबधबे, दऱ्यांचे कठडे, धोकादायक वळणे आदी ठिकाणी सेल्फी काढण्यास आणि नैसर्गिक धबधब्यांच्या ठिकाणी मद्यपान करण्यास बंदी घालण्यात आले आहे.
कोणत्या तालुक्यातील कोणत्या पर्यटनस्थळावर बंदी?
मावळ:
भुशी धरण आणि गड किल्ले परिसर, वडगाव मावळ येथील बेंदेवाडी, डाहुली (आंदर मावळ) पाण्याचे धबधबे, लोणावळा शहर आणि ग्रामीण हद्दीतील धरणे, टायगर पॉइंट, लायन्स पॉइंट, राजमाची पॉइंट, सहारा पूल, पवना धरण, टाटा धरण, घुबड तलाव परिसर
लोणावळा :
वन क्षेत्रातील पर्यटनस्थळांवर सायंकाळी सहानंतर बंदी
मुळशी :
मुळशी धरण, ताम्हिणी घाट जंगल परिसर, मिल्कीबार धबधबा
हवेली :
खडकवासला धरण, वरसगाव धरण, सिंहगड
आंबेगाव:
भीमाशंकर, डिंभे धरण परिसर, कोंढवळ धबधबा
जुन्नर :
माळशेज घाट, धरणे, गडकिल्ले परिसर, शिवनेरी, माणिकडोह
भोर :
भाटघर धरण, गडकिल्ले परिसर, धबधबा, वेल्हा धरण , गडकिल्ले परिसर, कातळधरा धबधबा
खेड :
चासकमान धरण, भोरगिरी घाट, पाण्याचे धबधबे, जंगल परिसर
पर्यटकांनी जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी नेमून दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे, अन्यथा पोलिसांनी कारवाईचा इशारा दिला आहे. तसेच लोणावळ्यात हुल्लडबाजी करणऱ्या तरुणांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येणार आहे. इतर पर्यटांना त्रास होईल असे वर्तन, हुल्लडबाजी आम्ही सहन करणार नाही.
हे ही वाचा :