पुणे : 'पुणे तिथे काय उणे' या म्हणीची प्रचिती सध्या पुण्यात पाहायला मिळत आहे. गोल्डनमॅनसाठी तर गोल्डन शर्टसाठी प्रसिद्ध असलेलं पुणे आता गोल्डन पेढ्यांसाठी प्रसिद्ध झालं आहे. पुण्यातील धायरीतील सुरेश पोकळे या शेतकऱ्यानं आलिशान जग्वार एक्सएफ गाडी खरेदी केली.
या अलिशान गाडी खरेदीचा आनंद साजरा करण्यासाठी त्यांनी चक्क सोन्याचा वर्ख असलेले पेढे वाटले. सुरेश पोकळे यांना महागडी गाडी खरेदी केल्यानंतर त्याचा आनंदही शाही पद्धतीनं साजरा करायचा होता. त्यामुळेच त्यांना लोकांना सोन्याचे पेढे वाटून त्यांचं तोंड गोड करायचं होतं.
याविषयी सुरेश पोकळे यांनी काका हलवाई मिठाईवाल्यांकडे विचारणा केली. काका हलवाई यांनीही पोकळे यांच्यासाठी विशेष सोन्याचे वर्ख असलेले पेढे बनवून दिले. 7 हजार रुपये किलो दरानं काका हलवाईनं पोकळे कुटुंबियांना हे खास पेढे बनवून दिले.
पोकळे कुटुंबियांनी नेमके किती पेढे वाटले याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र या सोन्याच्या पेढ्यांची पुण्यात जोरदार चर्चा रंगली आहे.
सुरेश पोकळे यांचा वडिलोपार्जित शेतीचा व्यवसाय आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून त्यांनी आपली वेळगी ओळख निर्माण करत परिसरात नावलौकिक मिळवला आहे.