पुणे : ‘पुणे तिथे काय उणे’ असं म्हटलं जातं. हीच उक्ती पुण्यातील प्रदूषणाच्या सद्यस्थितीवरुन नकारात्मक अर्थाने खरी ठरली आहे. जलप्रदूषण आणि ध्वनिप्रदूषणानंतर आता वायुप्रदूषणातही आघाडीवर असण्याची उणीव पुण्याने भरुन काढली आहे. नायट्रोजन डायऑक्सिडईड या विषारी वायूच्या उत्सर्जनात देशात पुण्याचा दुसरा नंबर लागतो. यामुळे पुण्यातील वायूप्रदुषणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पुण्यात हवेतल्या नायट्रोजन डायऑक्साईडचं प्रमाण हे 2013 पासून वाढतंच आहे. हे प्रमाण मायक्रोग्रॅम पर क्युबिक मीटर या परिमाणात मोजलं जातं.

पुण्यात वाढणाऱ्या वायूप्रदूषणाची दाहकता एका आरटीआयमधून समोर आली आहे. नायट्रोजन डायऑक्साईड या विषारी वायूच्या उत्सर्जनात 2017 साली दिल्लीनंतर पुण्याचा नंबर लागतो, असं समोर आलं आहे. आदित्य राठी यांनी आरटीआय अंतर्गत ही माहिती मागवली होती. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने ही माहिती दिली आहे. आदित्यने देशातील सगळ्यात जास्त नायट्रोजन डायऑक्साईडचं प्रमाण असणाऱ्या शहरांची माहिती मागवली होती.

पुण्यातल्या हवेतल्या नायट्रोजन डायऑक्साईडचं प्रमाण हे 2013 पासून वाढतंच आहे. हे प्रमाण मायक्रोग्रॅम पर क्युबिक मीटर या परिमाणात मोजलं जातं.

वर्ष – पुणे नायट्रोजन डायऑक्साईड प्रमाण (मायक्रोग्रॅम पर क्युबिक मीटर)     

२०१३ - ४१

२०१४ - ४५

२०१५ - ६२

२०१६ - ८५

२०१७ -  ६५

यातून पुढे आलेली धक्कादायक माहिती म्हणजे की, 2016 साली नायट्रोजन डायऑक्साईड या वायूच्या उत्सर्जनात पुण्याचा अव्वल क्रमांक होता. नायट्रोजन डायऑक्साईडचे अर्थातच अनेक वाईट परिणाम मानवी शरिरावर होतात, अशी माहिती श्वसनरोग तज्ज्ञ डॉ. पराग खटावकर यांनी दिली.

पुण्यात वाढत जाणाऱ्या प्रदूषणामागे नेमकं काय कारण आहे, याचा पाठपुरावा या विषयासंबंधी आरटीआय टाकणारा आदित्य करणार आहे. यामध्ये वाहनांमधून निघणारा धूर हे प्रमुख कारण असल्याचं मानलं जातंय. पण एवढं मात्र नक्की की, वाढत चाललल्या प्रदूषणाची दाहकता पुणेकरांनाही रोज जाणवते आहे. ते त्यांच्या परीने त्यापासून बचावाचे पर्याही शोधत आहेत, मात्र शासकीय पातळीवर काय प्रयत्न होत आहेत, हा संशोधनाचा विषय आहे.