Pune Crime : सावकारांच्या (Savkar) जाचाला कंटाळून सहकार विभागातील अधिकाऱ्याने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना पुण्यात (Pune) घडली आहे. सहकार विभागाच्या लेखाधिकाऱ्याने मंगळवार पेठेतील बालाजी हाईट्स या इमारतीमधील राहत्या घरी सोमवारी (19 सप्टेंबर) गळफास घेऊन आयुष्य संपवलं. गणेश शंकर शिंदे (वय 52 वर्षे) असं आत्महत्या केलेल्या अधिकाऱ्याचं नाव आहे. गणेश शिंदे यांनी सुसाईड नोटही लिहिलेली आहे, ज्यात सावकारांनी पैशांसाठी तगादा लावल्यामुळे आत्महत्या करत असल्याचं म्हटलं आहे.


मुंबईतून पुण्याला बदली पाहिजे असल्याने अधिकाऱ्यांना पैसे देण्यासाठी गणेश शंकर शिंदे यांनी सावकारांकडून 20 ते 25 टक्के व्याजदराने 84 लाख 50 हजार रुपये कर्ज घेतलं होतं. त्यांनी अधिकाऱ्यांना पैसे दिले, त्यानंतर त्यांची बदली देखील झाली. परंतु सावकारांचं दिलेल्या कर्जाचे काही हफ्ते गणेश शिंदे यांनी थकवले. सावकाराचं कर्ज फेडण्यासाठी त्यांनी बँकेतून लोन घेण्याचीही तयारी केली होती. परंतु लोन करुन देणाऱ्या व्यक्तीने पैसे घेऊन ऐनवेळी लोन मंजूर करण्यास नकार दिला. यामुळे सावरकारांनी पैशांसाठी लावलेला तगादा आणि फसवणूक यामुळे कंटाळलेल्या सहकार विभागाचे लेखाधिकारी गणेश शिंदे यांनी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. सोमवारी त्यांनी राहत्या घरी गळफास घेतला.


सात जणांविरोधात गुन्हा दाखल
यानंतर गणेश शिंदे यांच्या पत्नी शोभना यांनी दिलेल्या तक्रारीनंतर फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये सात जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शंकर लक्ष्मण गायकवाड, विजय सोनी आणि त्यांचे वडील, बाळकृष्ण क्षीरसागर, गणेश साळुंखे, मनीष हाजरा, पंधरकर अशी गुन्हा नोंदवलेल्या आरोपींची नावं आहेत. त्यापैकी विजय सोनी, बाळकृष्ण क्षीरसागर, गणेश साळुंखे आणि मनीष हाजरा यांना अटक करण्यात आली आहे.


दबावाखाली येऊन मानसिक त्रासातून शिंदे यांची आत्महत्या
पत्नीने दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, "गणेश शंकर शिंदे यांनी आर्थिक विवंचनेतून भरमसाठ व्याजाने सहा सावकारांकडून 84 लाख 50 हजार रुपयांचं कर्ज घेतलं होतं. मुद्दल आणि व्याजाच्या पैशांसाठी हे सावकार गणेश शिंदे यांचा मानसिक छळ करुन तगादा लावून त्रास दिला होता. तर पंधरकर या आरोपीने गणेश शिंदे यांना एक कोटी रुपयाचं पर्सनल लोन करुन देण्याचं आश्वासन देऊन त्या मोबदल्यात त्यांच्याकडून पैसे घेऊन ऐनवेळी लोन करण्यास नकार दिला आणि फसवणूक केली. यामुळे दबावाखाली येऊन मानसिक त्रासातून गळफास घेऊन आत्महत्या केली."


इतर महत्त्वाच्या बातम्या



Dhule News : अवैध सावकार राजेंद्र बंबने विमा पॉलिसीतून मिळवलं पाच कोटीचं कमिशन, स्वत:सह कुटुंबियांच्या नावे 125 मालमत्ता