Pune News:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासारख्या हुबेहूब दिसणाऱ्या विजय मानेंवर (Vijay Mane) पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Pune Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समाजात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा मलीन करण्याचा आरोप माने याच्यावर आहे. तसंच माने यांचे सराईत गुंड शरद मोहोळसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. याप्रकरणी आता मानेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी विजय माने यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती.
विजय माने यांची दाढी आणि कपाळावर टिळा आणि व्हाईट शर्ट आणि पॅन्ट असा सेम टू सेम मुख्यमंत्र्यांसारखा पोशाख असल्यानं ते चर्चेत असायचे. मात्र आता विजय माने यांचे सराईत गुन्हेगार शरद मोहोळ याच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. याप्रकरणी खंडणी विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मोहन जाधव यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. बंडगार्डन पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायदान्वये गुन्हा दाखल केला असून संबंधित प्रकरणाचा तपास सुरु आहे.
दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, विजय माने हा नियमितपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखी वेशभूषा आणि पोषाख करुन समाजात वेगवेगळ्या कार्यक्रमात सार्वजनिक ठिकाणी जाऊन लोकांचा गैरसमज व्हावा, अशा पद्धतीने वावरत होता. लोकांची जाणीवपूर्वक दिशाभूल करण्याचा प्रयत्न विजय माने व इतरांनी करुन मुख्यमंत्री शिंदे यांची प्रतिमा मलीन करण्यासाठी सराईत गुन्हेगारासोबत फोटो सोशल मीडियात व्हायरल करुन गैरसमज पसरवला आहे, असं फिर्यादीत म्हटलं आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्याचा कारभार हाती घेतल्यानंतर विजय माने यांची देखील चर्चा सुरु झाली. विजय माने हे मुख्यमंत्र्यांसारखा पेहराव करुन वावरायचे. त्यांना अनेक कार्यक्रमांसाठी देखील आमंत्रणं मिळायची. गणपतीच्या काळात त्यांचे डान्स करतानाचे व्हिडीओ देखील व्हायरल झाले होते. यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपल्या परिसरातील प्रश्न देखील मांडले होते.
काय म्हणाले विजय माने...
गुन्हा दाखल झालेल्या विजय माने यांच्याशी एबीपी माझानं संवाद साधला. ते म्हणाले की, मी शरद मोहोळ याला ओळखत नाही. मला माहीत नसताना माझे नकळत फोटो काढले गेले, कोणत्याही प्रकरणाची शहानिशा न करता माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मी वेळोवेळी पोलिसांनी सहकार्य केलं आहे. मुख्यमंत्री साहेबांना आणि माध्यमांना मी वेळोवेळी सांगितलं, की मुख्यमंत्री माझ्यासाठी देव आहेत. त्यांची प्रतीमा मलीन होईल, असं कोणतही कृत्य मी केलेलं नाही आणि करणारही नाही. गैरवापर करुन माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याचं विजय माने यांनी म्हटलं आहे. जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो, असंही ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या
शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना स्थगितीबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...