अकोला : अकोल्यात सहकार विभागानं सावकारांच्या विरोधात धडक कारवाई केली आहे. सावकारांनी अवैधपणे बळकावलेली तब्बल 88 एकर शेती मूळ मालक शेतकऱ्यांना परत देण्यात आली आहे.

सहकार विभागाच्या या कारवाईमुळे 15 शेतकऱ्यांना आपल्या शेतीचा मालकी हक्क मिळाला आहे. या शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड केल्यानंतरही सावकारांनी त्यांची शेती बळकावली होती.

गेल्या वर्षभरात अकोला जिल्ह्यात सावकारांनी हडपलेली तब्बल 94 एकर शेती मूळ मालक शेतकऱ्यांना परत करण्यात आली आहे.

अनंत भाकरेंची व्यथा

अनंत भाकरे हे अकोल्यातील मोरगाव भाकरे येथे राहणारे शेतकरी. अनंत यांचा 18 वर्षांचा संघर्ष आणि शेतीसोबतची ताटातूट अखेर काल संपली. सावकाराने पचवलेली आपली शेती परत मिळवण्यासाठी हा संघर्ष होता.

अनंत यांच्याकडे पाच एकर शेती होती. 1999 मध्ये अनंत यांनी अकोल्याच्या रमेशचंद्र गोलेच्छा या सावकाराकडून 1 लाख 40 हजारांचं कर्ज घेतलं होतं. बदल्यात सावकारानं त्याच्याकडून जमिनीची मालकी स्वतःकडे घेण्याचे लिहून घेतली. व्याजासह पैसे परत केल्यावर शेती परत करण्याचा तोंडी व्यवहार झाला.

नापिकी आणि दुष्काळासारख्या अडचणी असतानाही अनंत यांनी 2006 पर्यंत हे कर्ज फेडलं. मात्र, तोपर्यंत सावकाराची नियत फिरली आणि अनंतच्या हक्काची शेती सावकाराच्या घशात गेली.

2006 पासून न्यायालयीन संघर्ष सुरु झाला. शेवटी हे प्रकरण सुनावणीसाठी अकोल्याच्या जिल्हा उपनिबंधकांकडे आले. काल अखेर अनंत यांना न्याय मिळाला. त्यांची शेती त्यांना परत मिळाली.

2014 साली राज्यात लागू झालेल्या सावकारविरोधी कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली. कायदा लागू झाल्यानंतर आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई मानली जाते आहे.

दरम्यान, गेल्या वर्षभरात अकोला जिल्ह्यात 94 एकर शेती सावकाराकडून मुक्त करीत शेतकऱ्यांना परत करण्यात आली आहे. अकोल्याचे जिल्हा उपनिबंधक गोपाल मावळे यांच्या पुढाकाराने सावकारमुक्त शेतीचा हा अकोला पॅटर्न जिल्ह्यात चांगलाच परिणामकारक ठरला आहे.

या मालकी आदेशानंतर आता प्रत्यक्ष कारवाईसाठी हे प्रकरण आता महसूल विभागाकडे जाईल. महसूल विभाग शेतीचा सात-बारा या शेतकऱ्यांच्या नावावर करून त्यांच्या मालकीवर अंतिम मोहोर उमटवतील. यानंतर या सर्व सावकारांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल. मात्र, सरकारच्या कायद्याची अंमलबजावणी परिणामकारकपणे केली तर सर्वसामान्यांना न्याय मिळू शकतो, हे अकोल्यातील या कारवाईनं दाखवून दिलं आहे.