पुणे : कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी मिलिंद एकबोटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. पुणे सत्र न्यायालयाने एकबोटेंचा अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळल्यामुळं त्यांना कधीही अटक होऊ शकते. एकबोटेंवरील आरोप गंभीर असल्याचं सांगत कोर्टानं त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. कोरेगाव-भीमा हिंसाचारप्रकरणी त्यांच्याविरोधात पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचप्रकरणी त्यांनी गेल्या आठवड्यात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. या अर्जावर पुणे सत्र न्यायालयात आज सुनावणी झाली.


‘एकबोटे यांना गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस संरक्षण आहे. त्यामुळे कोरेगाव-भीमा येथील हिंसाचारात ते सहभागी असूच शकत नाहीत.’ असा युक्तीवाद त्यांच्या वकिलांनी कोर्टासमोर केला. या सुनावणीसाठी मिलिंद एकबोटे कोर्टात हजर नव्हते.

1 जानेवारीला कोरेगाव-भीमा येथील हिंसाचारानंतर भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांच्याविरोधात 2 जानेवारीला पिंपरी पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यानंतर भिडे गुरुजी यांनी माध्यमांसमोर येऊन आपली बाजू मांडली होती. पण त्या दिवसापासून एकबोटे यांचा ठावठिकाणा कुणालाही माहित नाही. त्यांच्या संघटनेच्या वतीने त्यांच्या नावे पत्रके काढली गेली, त्यांची भूमिका मांडणारे काही व्हिडीओ समोर आले पण एकबोटे स्वत: मात्र माध्यमांसमोर आले नाही.

आज एकबोटेंच्या जामीन अर्जावर सुनावणी होत असताना एकबोटेंच्या बाजूने त्यांच्या वकीलांनी युक्तिवाद केला. मात्र, त्याला प्रतिवाद करण्यासाठी राज्य सरकारकडून कोणत्याही सरकारी वकिलाला नियुक्त करण्यात आले नव्हते. मात्र दलित संघटनांनी त्यांच्या बाजूने वकील नियुक्त केले होते.

दरम्यान, कोर्टाने युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर मिलिंद एकबोटेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. एकबोटेंवर दाखल असलेला गुन्हा गंभीर असल्याने अटकपूर्व जामीन देता येत नाही. असंही कोर्टाने यावेळी नमूद केलं.

भिडे गुरुजी, मिलिंद एकबोटेंविरोधात गुन्हा दाखल

एका महिलेच्या तक्रारीनंतर संभाजी भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर पिंपरी पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न, अॅट्रॉसिटी, जाळपोळ, सार्वजनिक नुकसान, सशस्त्र हल्ला, बेकायदेशीर जमाव आणि असंघटित गुन्हेगारी या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संंबंधित बातम्या :

दगडफेकीप्रकरणी भिडे गुरुजी, मिलिंद एकबोटेंवर गुन्हा