न्यायमूर्ती साधना जाधव यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी सुरू आहे. ही रक्कम जमा करण्यासाठी डीएसकेंची सर्वत्र वणवण सुरू असल्याची कोर्टाला माहिती देण्यात आली. तपासयंत्रणांनी देशभरातील सर्व खाती गोठवल्याने अनेक अडचणी येत असल्याचं याचिकाकर्त्यांनी हायकोर्टाला सांगितलं. मात्र या पैशांची तजवीज पूर्ण झाल्याचे कागद सोमवारी हायकोर्टात सादर करण्यात आले.
प्रभुणे इंटरनॅशनल या डीएसकेंच्याच एका परदेशस्थ कंपनीमार्फत 80 लाख अमेरीकन डॉलर्स डीएसकेंच्या बँक ऑफ बडोदा या भारतीय बँकेतील खात्यात जमा करण्यात आले. 40-40 लाख अमेरीकन डॉलर्सचे दोन व्यवहार झाल्याचे पुरावे कोर्टासमोर ठेवण्यात आले. भारतीय चलनानुसार जवळपास ही रक्कम 51 कोटींच्या घरात आहे. मात्र ही रक्कम अजूनही डीएसकेंच्या भारतीय खात्यात जमा झालेली नाही.
येत्या 72 तासांत पैसे खात्यात जमा होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे 25 जानेवारीपर्यंत हायकोर्टाने डीएसकेंना अखेरची संधी दिली आहे. तसेच या व्यवहारावर लक्ष ठेवण्याचे तपास यंत्रणेला निर्देश देण्यात आले आहेत. 25 जानेवारीला डीएसकेंच्या अटकपूर्व जामिनावर हायकोर्टात पुन्हा होणार सुनावणी होईल.