पिंपरी चिंचवड : कंजारभाट समाजातील नववधूची कौमार्य चाचणी या अनिष्ट प्रथेविरुद्ध व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून आवाज उठवणाऱ्या तरुणांना समाजातीलच अन्य तरुणांकडून मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी पिंपरी पोलिस स्टेशनमध्ये परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कंजारभाट समाजात लग्नानंतर नववधूची कौमार्य चाचणी घेण्याची अनिष्ट प्रथा आजही समाजात कायम आहे. या समाजात लग्नाच्या पहिल्या रात्री मुलीची कौमार्याची चाचणी केली जाते. प्रथेला समाजातीलच काही तरुणांनी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून आवाज उठवला आहे. यासाठी तरुणांनी # Stop The "V"Ritual या नावाने व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला आहे.
प्रशांत इंद्रेकरसह त्याचे काही मित्र या ग्रुपचे सदस्य आहेत. ही प्रथा बंद व्हावी यासाठी ते प्रयत्न करत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या या मोहिमेला अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेही पाठिंबा दिला आहे. मात्र त्यांचं हे कृत्य त्यांच्याच समाजातील अन्य तरुणांना पटलं नाही.
आरोपी सनी मलकेच्या बहिणीचा विवाह होता. सनी मलकेने तक्रारदार प्रशांत इंद्रेकरसह त्याच्या मित्राला लग्नाचं आमंत्रण दिलं होतं. 21 जानेवारीला रात्री हा विवाह पार पडला. यानंतर प्रथेनुसार जातपंचायत भरली. जात पंचायत संपल्यानंतर प्रशांत मंडपात गेला असता, तिथे सनी मलके आणि त्याचे साथीदार मित्राला मारहाण करत असल्याचं प्रशांतला दिसलं.
कौमार्य प्रथेविरुद्ध आवाज उठवून, टीव्हीवर बातम्या देऊन तुम्ही समाजाची बदनामी करत आहात असं म्हणत मारहाण सुरु होती. यानंतर प्रशांत आणि त्याचा आणखी एक मित्र दुसऱ्या मित्राला सोडवायला गेले. परंतु आरोपी सनी मलके आणि त्याच्या साथीदारांनी प्रशांतलाही मारहाण केली.
प्रशांत इंद्रेकर या तरुणाच्या तक्रारीनंतर पाच जणांसह त्यांच्या अन्य 40 साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. सनी मलके(वय 25 वर्ष), विनायक मलके, (वय 22 वर्ष) अमोल भाट, (वय 20 वर्ष), रोहित रावळकर, (वय 21 वर्ष), मेहूल तामचीकर (वय 23 वर्ष) अशी गुन्हा दाखल झालेल्या तरुणांची नावं आहे.
कौमार्य चाचणी प्रथेविरोधात व्हॉट्सअॅप ग्रुप चालवणाऱ्या तरुणांना मारहाण
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Jan 2018 11:01 AM (IST)
कंजारभाट समाजात लग्नानंतर नववधूची कौमार्य चाचणी घेण्याची अनिष्ट प्रथा आजही समाजात कायम आहे. या समाजात लग्नाच्या पहिल्या रात्री मुलीची कौमार्याची चाचणी केली जाते.
प्रातिनिधीक फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -