पुणे : जिल्ह्यातील हवेली विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांच्या अनुषंगाने आज मुख्यमंत्र्यांच्या (Chief minister) उपस्थितीत बैठक पार पडली. मात्र, या बैठकीवरुन राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी लोकप्रतीनिधींचा अपमान केल्याचा आरोप पुरंदरचे आमदार संजय जगताप (Sanjay Jagatap) यांनी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृहावरती पुरंदर आणि हवेलीच्या प्रश्नासंदर्भात बैठक लावली होती. याची माहिती आमदार संजय जगताप यांना मिळताच त्यांनी मुख्यमंत्री यांना पत्र लिहून बैठक पुढे ढकलण्याची विनंती केली होती. मात्र, तरी देखील मुख्यमंत्र्यांनी ही बैठक घेतली. त्यावरून संजय जगताप आक्रमक झाले आहेत. तसेच, नाव न घेत माजी मंत्री विजय शिवतारेंना (Vijay Shivtare) लक्ष्य करत मुख्यमंत्र्यांकडून लोकप्रतिनीधींचा अवमान करण्यात आल्याचेही त्यांनी म्हटलंय.
पुरंदर तालुक्यातील सासवडमध्ये आमसभेचे आयोजन केले होते. त्यामुळे सह्याद्री अतिथी गृहावर होणारी बैठक तुम्ही पुढे ढकलावी अशी विनंती आमदार संजय जगताप यांनी मुख्यमंत्री यांना पत्र लिहून केली होती. परंतु मुख्यमंत्र्यांनी त्या विनंतीला मान न देता माजी लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत ही बैठक घेतल्याने संजय जगताप आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्री यांनी पुरंदरच्या आणि हवेलीच्या जनतेचा अपमान केला आहे. तसेच, लोकप्रतिनिधींचा देखील अपमान केला आहे, अशी टीका आमदार संजय जगताप यांनी केली आहे.
बैठकीला विजय शिवतारेंची उपस्थिती
दरम्यान, माजी मंत्री विजय शिवतारे यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरुनही या बैठकीचे अपडेट दिले आहेत. पुरंदर हवेली मतदारसंघातील विविध प्रश्नांवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. लोकसभा निवडणुकीपूर्वी पुरंदर हवेलीचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे मी याबाबात मागणी केली होती. त्यानुसार आज ही उच्चस्तरीय बैठक पार पडली. यावेळी गुंजवणी, फुरसुंगी उरुळी देवाची नगरपालिका, समाविष्ट गावांचा कर, पुरंदर आयटी पार्क, पुरंदर उपसा योजना, जांभुळवाडी तलाव अशा विविध विषयांवर महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले, अशी माहिती विजय शिवतारे यांनी दिली आहे.
जगताप यांनी पत्रात काय म्हटले
महोदय, वरील विषयानुमार, पुरंदर तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयाअंतर्गत झालेल्या विकास कामांचा सद्यस्थितीचा आढावा, अडीअडचणी, नागरीकांच्या सुचना, मागणी इत्यादीबाबत सविस्तर बर्चा व निवारण त्याचप्रमाणे सन 2024-25 मधील कामांचे नियोजन शासनस्तरावर राबविल्या जाणाऱ्या लोकोपयोगी योजनाची अंमलबजावणी इत्यादी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी बुधवार 24 जुलै रोजी सकाळी 10 वाजता आचार्य अत्रे सांस्कृतिक भवन, सासवड येथे आयोजित करण्याकरीता मागील दिड महिन्यापासून आमसभा नियोजन सुरू होते. त्यानुषंगाने आज रोजी आमसभेनिमित्त संबंधीत विभागांचे अधिकारी व कर्मचारी तसेच तमाम पुरंदर तालुक्यातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थितीत आहेत. आपण पुरंदर विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक आज 24 जुलै रोजी सह्यादी अतिथीगृह, मुंबई येथे आयोजित केल्याचे समजते. परंतु आमसभेकरीता सर्व अधिकारी उपस्थितीत असल्याने आज होणारी बैठक रद्द करून पुढील तारीख व वेळ मिळणेकामी आपल्या स्तरावरून संबंधितांना आदेश व्हावेत, हि नम्र विनंती, असे पत्र आमदार जगताप यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले होते. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बैठक घेऊन पुरंदर हवेली मतदारसंघातील विविध प्रश्नांवर चर्चा केली.