मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असून उपोषणकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी आज आपलं उपोषण स्थगित केलं आहे. आता, विधानसभा निवडणुकांची तयारी करणार असून राज्यात किती जागा लढवायच्या हे 13 ऑगस्ट रोजी जाहीर करणार असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलं. दुसरीकडे अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या श्याम मानव यांनी नाव न घेता भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshkmukh) यांचा संदर्भ देत मानव यांनी भाजप नेत्यांना लक्ष्य केलं. त्यावरुन, आता भाजप नेतेही आरोपांना प्रत्युत्तर देत आहेत. भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra wagh) यांनी व्हिडिओच्या माध्यमातून श्याम मानव यांच्या आरोपांचे खंडन केले आहे. तसेच, मनोज जरांगे आणि श्याम मानव एकच अजेंडा चालवत असल्याचंही त्यांनी म्हटलं. 


मनोज जरांगे यांनी आता जनतेत जाऊन आपण पुढील भूमिका ठरवणार असल्याचे म्हटले आहे. तर, श्याम मानव यांच्या आरोपावरुन माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही भाजपला लक्ष्य केलंय. आता, याच घटनांचा संदर्भ देत चित्रा वाघ यांनी आरोपांवर पलटवार केला आहे. मनोज जरांगे जनतेत जाणार आणि श्याम मानव देखील जनतेत जाणार आहेत. म्हणजे, दोघांचा एकच अजेंडा असणार, भाजपला पराभूत करा.  मोठ्या साहेबांची इकोसिस्टीम आता सतर्क झालेली आहे, अशा शब्दात चित्रा वाघ यांनी श्याम मानव यांनी केलेल्या आरोपावरुन पलटवार केला आहे.  


लोकशाहीत प्रत्येकाचे स्वागत आहे, फेक नरेटीवची एक मोठी फॅक्टरी लोकसभेत तयार झालेली होती. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी आधीच म्हटलंय, जेव्हा मी अनिल देशमुख यांच्या बद्दल बोलेन तेव्हा त्यांना तोंड दाखवायला देखील जागा राहणार नाही. अनिल देशमुख यांच्याकडे पुरावा मागितला मग ते उठून का गेले, असा सवाल चित्रा वाघ यांनी विचारला. तसेच, विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांची कथा विधानसभेत मांडली. हा सरकारी वकील शरद पवार यांचा ऑपरेटिव्ह एजंट असणारा आहे, याचा व्हिडिओ देखील समोर आला होता.  तर, अनिल गोटे यांचेही संभाषण समोर आलं होतं. दरम्यान, अनिल देशमुख यांनी 100 कोटी नाहीतर 250 कोटी पेक्षा अधिक पैसे वसुलीतून कमावले असल्याचा गंभीर आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे. 


काय म्हणाले होते श्याम मानव


"अनिल देशमुख गृहमंत्री असताना काही लोकांकडून सांगण्यात आलं होतं की, तुम्हाला ईडीच्या प्रकरणातून स्वतःची सोडवणूक करून घ्यायची असेल, तर तुम्ही 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात उद्धव ठाकरे यांचं नाव घ्यावं. आदित्य ठाकरे यांचं नाव दिशा सालियन बलात्कार आणि हत्या प्रकरणात घ्यावं, अनिल परब यांचंही नाव त्यांच्याशी संबंधित बेकायदेशीर व्यवहारांच्या प्रकरणात घ्यावं. मात्र, अनिल देशमुख यांनी तसं केलं नाही.", असं श्याम मानव यांनी म्हटलं होतं. त्यानंतर, अनिल देशमुख यांनीही याप्रकरणी भाष्य करताना भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत.