TET परीक्षा घोटाळा प्रकरण : TET परीक्षा पेपरफुटी प्रकरणात पुणे पोलिसांकडून मोठी माहिती मिळाली आहे. शिक्षक पात्रता परीक्षेत महाराष्ट्र परीक्षा मंडळाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांच्या घरातून पहिल्या धाडीत 88 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केल्यानंतर आता दुसऱ्या धाडीत दोन कोटींहून अधिक रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे. दुसऱ्या धाडीत तुकाराम सुपे यांच्या घरी आणखी पैशाचं घबाड सापडलं आहे. पोलिसांना तपासात सुपेंच्या घरातून दोन कोटीहून अधिक रक्कम आणि सोने हस्तगत केलं आहे. सुपे यांच्या घरी पोलीस धाड टाकायच्या आधीच पत्नी आणि मेहुण्याने रक्कम दुसरीकडे ठेवली होती. मात्र पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर दोन कोटींहून अधिक रक्कम आणि सोने मिळाले.
याआधी 17 डिसेंबर रोजी शिक्षक पात्रता परीक्षेत महाराष्ट्र परीक्षा मंडळाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांच्या घरातून 88 लाख रुपयांची रोख रक्कम पुणे पोलिसांनी जप्त केली होती. पुणे पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचा अतिरीक्त कार्यभार असलेले तुकाराम सुपे यांना पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. सुपेंसोबत शिक्षण आयुक्ताचा सल्लागार अभिषेक सावरीकर यालाही पोलिसांनी अटक केली आहे.
म्हाडा पेपरफुटीप्रकरणी सुरू असलेल्या तपासात अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत असून इतर परीक्षांमधील घोटाळे बाहेर येत आहेत. शिक्षक पात्रता परीक्षेतही पैसे घेऊन अनेकांना उत्तीर्ण करण्यात आल्याचे समोर आले आहे.
पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले होते की, दोन पेपरफुटीचे प्रकरणाचा तपास सुरू होता. म्हाडा पेपरफुटीचा तपास सुरू असताना टीईटीमध्ये गोंधळ असल्याचे दिसून आले. या प्रकरणी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक केली. यामध्ये सुपे आणि सावरीकरचा समावेश आहे.
कसा करायचे टीईटीमध्ये घोटाळा
जी. ए. टेक्नॉलॉजीकडे भरती प्रक्रियेची जबाबदारी होती. शिक्षक पात्रता परिषदेत उत्तीर्ण होण्यासाठी पैसे दिलेल्या परीक्षार्थींना ओएमआर शिट रिकामी ठेवण्याची सूचना करण्यात आली होती. पेपर स्कॅनिंग करून तपासणी करण्याच्या वेळी ओएमआर उत्तरपत्रिका भरली जायची आणि उत्तीर्ण केले जायचे. या दरम्यानही काही परीक्षार्थी नापास झाल्यास त्यांना पुर्नमूल्यांकनासाठी अर्ज करण्यास सांगितले जायचे आणि त्यात पास केले जात होते. मिळालेल्या माहितीनुसार, प्राथमिक अंदाजानुसार, प्रत्येक परीक्षार्थीकडून 35 हजार ते एक लाख रुपये घेतले जात असत.
आणखीही काही घोटाळे समोर येणार?
म्हाडा पेपरफुटीवरून हा तपास सुरू झाला, त्यातून इतर परीक्षांचे घोटाळे समोर आले त्यामुळे भविष्यात आणखी घोटाळे बाहेर येऊ शकतात आणि अटकही होऊ शकते. ही फक्त सुरुवात असल्याचे पोलीस आयुक्तांनी म्हटले होते.
संबंधित बातम्या
Tukaram Supe : तुकाराम सुपे यांना पुणे पोलिसांकडून अटक,'टीईटी'त लाच घेऊन पास केल्याचा ठपका
MHADA Paper Leak : महाराष्ट्र परीक्षा मंडळाचे अध्यक्ष तुकाराम सुपेच्या घरातून 88 लाखांची रोकड जप्त
Mhada Exam Paper : म्हाडा पेपर फुटीच्या चौकशीत धक्कादायक माहिती, वापरला खास Code Word
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha