Chandrakant Patil vs Girish Bapat : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन रविवारी पुणे दौऱ्यावर आहेत. अमित शाह यांची पुण्यात जाहीर सभा झाली. अमित शाह यांच्या पुणे दौऱ्यादरम्यान प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्यातील शीतयुद्ध पाहायला मिळाले. अमित शाह यांच्या दौऱ्यात डावलले गेल्याने नाराज झालेले गिरीश बापट सकाळपासून गायब होते. अमित शाह यांच्या आजच्या दौर्‍याची सुरुवात जिथून झाली ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर बापटांच्या घरापासून अतिशय जवळ असुनही त्यावेळेस अनुपस्थित राहिले.  एवढच नाही तर पुणे महापालिकेत आयोजित कार्यक्रमालाही बापट हजर नव्हते. त्यामुळे अमित शाह यांनी बापट कुठे आहेत? अशी विचारणा केली असता, भाजपच्या नेत्यांची धावपळ सुरु झाली. 


अमित शाह यांनी विचारणा केल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी अनेकदा फोन करुनही बापटांनी फोन उचलला नाही. एवढेच नाही तर स्वतः अमित अमित शाह यांच्याकडून बापटांना फोन लावल्यानंतर देखील फोन उचलला गेला नाही, असं भाजपच्या नेत्यांकडून खाजगीत सांगण्यात आलं.  त्यानंतर अखेर बापटांच्या घरी भाजपच्या एका पदाधिकाऱ्याला पाठवण्यात आले आणि त्याने अमित शाह यांचे बापटांशी बोलणं करुन दिले. अमित शाह यांच्याशी बोलणं झाल्यावर अखेर गिरीश बापट संध्याकाळी गणेश कला क्रिडा संकुलात आयोजित भाजपच्या मेळाव्यात हजर झाले. अमित शाह यांच्यासमोरच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्यातील जुगलबंदी पहायला मिळाली. चंद्रकांत पाटील भाषण करताना म्हणाले की, आता अमित शाहा कार्यक्रमास आल्यानंतर बापटांचा खोकला जाईल असं वाटतेय. चंद्रकांत पाटील यांच्या या टोमण्याला बापट यांनीही प्रत्युत्तर दिलं. गिरिष बापट म्हणाले की, अमित शाह यांच्यामुळे माझाच नाही तर सगळ्यांचाच खोकला जाईल. त्याचबरोबर फ्लेक्स आणि पेपरमधे फोटो छापून आल्याने मतदान मिळत नाही, तर लोकांमधे जाऊन काम करावे लागते असं म्हणत अमित शाहा यांच्या आजच्या दौऱ्यात फ्लेक्सबाजी करणाऱ्या नेत्यांना फटकारलं. 


मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live