पुणे: पुण्यात हेल्मेटसक्ती केल्यामुळे पुन्हा एकदा पुणेकरांनी संताप व्यक्त केला होता. त्यानंतर काल(गुरूवारी) शहरात हेल्मेट सक्ती नाही, तर हेल्मेटसक्ती फक्त हायवेसाठी असल्याचं पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. विनाहेल्मेट दुचाकीस्वार व पाठीमागे बसलेला प्रवासी अशा दोघांवर कारवाई करण्याच्या राज्य सरकारकडून काढलेल्या आदेशापासून पुणेकरांना तूर्तास दिलासा मिळाल्याचं चित्र आहे. 


शहरात वाहतुकीच्या बाबतीत शहरात काम करणाऱ्या सामाजिक संस्था, संघटना, लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा करत, हेल्मेटच्या वापराबाबत जनजागृती केल्यानंतर जानेवारी महिन्यामध्ये कारवाईबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचं पुणे पोलिसांनी सांगितलं आहे. विनाहेल्मेट दुचाकीस्वार व पाठीमागे बसलेल्या अशा दोघांवर कारवाई करण्याचा आदेश वाहतूक विभागाच्या अपर पोलिस महासंचालकांनी राज्यातील सर्व पोलिस आयुक्त व पोलिस अधीक्षकांना सोमवारी दिला होता. आधी काही ठिकाणी कारवाई देखील सुरू केली होती. त्याला विरोध होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, तो निर्णय आता तूर्तास दिलासा मिळाल्याचं चित्र आहे. 


विनाहेल्मेट दुचाकीस्वार व सहप्रवाशांचे अपघात आणि मृत्युमुखी होण्याची संख्या, जखमी होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे राज्यात हेल्मेटसक्ती केली आहे. तरीही काही दुचाकीचालक हेल्मेटचा वापर करत नसल्याचे दिसून आले आहे. स्वतःच्या सुरक्षेसाठी वाहनचालकांनी नियमित हेल्मेटचा वापर करावा, यासाठी आम्ही जनजागृती करण्यावर भर देणार आहे, असं पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं आहे.


प्रशासकीय यंत्रणांशी चर्चा करून कारवाईबाबत जानेवारीत निर्णय घेणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी गुरुवारी दिली आहे. पुण्यात हेल्मेटसक्ती लागू करू नये, या मागणीसाठी आमदार हेमंत रासने यांनी पोलिस आयुक्तांची भेट घेऊन चर्चा केली. अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने महामार्गांवरील दुचाकीस्वार व सहप्रवाशांसाठी हा आदेश काढल्याचे आयुक्तांनी त्यांना सांगितले.