पुणे : एखाद्या सामान्य व्यक्तीला परदेशात जायचं असेल किंवा  यायचं असेल तर एअरपोर्ट एथॉरिटी आणि इमिग्रेशनच्या परवानग्या घ्याव्या लागतात. मात्र पैसा आणि सत्ता असेल तर हे सगळं कसं झटपट होतं हे राज्याचे माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत याच्या बाबतीत दिसून आलं. ऋषीराजने बँकॉकला फिरालया जाणं हे त्याच्या पत्नीला आणि वडील तानाजी सावंतांना मान्य नव्हतं. त्यामुळे तानाजी सावंतांनी त्यांची सर्व राजकीय ताकद पणाला लावली आणि त्याचे विमान हवेतूनच फिरवून पुण्याला आणलं. 


मित्रांसह बँकॉकला जाण्यासाठी ऋषीराजने 9 जानेवारीला  रविवारी ग्लोबल फ्लाईट हँडलिंग सर्व्हिसेस या कंपनीचं विमान बुक केलं. त्यासाठी तब्ब्ल 68 लाख रुपये त्याने मोजले. पण त्याने बँकॉकला जाणं हे त्याच्या पत्नीला आणि वडील तानाजी सावंतांना मान्य नव्हतं. मात्र कोणाचंही न ऐकता ऋषीराज सावंत हा संदीप वसेकर आणि प्रवीण उपाध्ये या दोन मित्रांसह सोमवारी बँकॉकला जायला निघाला. 


तानाजी सावंतांची ताकद पणाला, मुख्यमंत्री कार्यालयाकडून सूत्रं फिरली


दुसरीकडे त्याचे वडील तानाजी सावंत यांनी त्याला रोखण्यासाठी आपली सर्व ताकत पणाला लावायची ठरवलं. ऋषीराज सावंतला बँकॉकला घेऊन जाणाऱ्या खाजगी विमानाने पुणे विमानतळावरून सोमवारी संध्याकाळी 4.30 वाजता उड्डाण केलं. विमानात त्यावेळी कॅप्टन परीक्षित अग्निहोत्री, कॅप्टन श्रेष्ठ अग्निहोत्री आणि एअर होस्टेस जॉयश्री नाथ हे तीन क्रू मेंबर होते.  


इकडे तानाजी सावंतांनी त्यांच्या राजकीय ताकतीचा वापर सुरु केला. तानाजी सावंतांनी ते ज्या पक्षात आहेत त्या पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदेंशी आधी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न सुरु झाला. त्यालाही लवकर प्रतिसाद मिळाला नाही. मग तानाजी सावंतांनी त्यांचे नातेवाईक असलेल्या चिंचवडचे भाजपचे आमदार शंकर जगताप यांची मदत घेतली. त्यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांशी संपर्क झाला आणि वेगाने सूत्रं फिरायला लागली.


अपहरणाची खोटी तक्रार दाखल केली


मुख्यमंत्री कार्यालयाकडून पुणे पोलिसांना सूचना देण्यात आल्या आणि त्याचवेळी केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनाही निरोप देण्यात आला. हवेत प्रवास करत असलेलं विमान परत बोलावण्यासाठी पोलिसांना ठोस कारण हवं होतं. त्यासाठी ऋषीराजचे अपहरण झाल्याची तक्रार पुण्यातील सिंहगड रोड पोलिस ठाण्यात देण्यात आली. तानाजी सावंत यांच्या संस्थेतील राहुल करळे यांनी ही तक्रार दिली . 


मुरलीधर मोहोळांनी विमान हवेतूनच परतवलं


दुसरीकडे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी डायरेकटर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन कार्यालयाला सूचना केली. तिथून एअर ट्राफिक कंट्रोलला सूचना देण्यात आल्या. एअर ट्रॅफिक कंट्रोलकडून विमानाचे पायलट परीक्षित अग्निहोत्री आणि श्रेष्ठ अग्निहोत्री यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरु झाला. तोपर्यंत हे विमान बंगालच्या उपसागरावर पोहचलं होतं. 


एकूण 18 लोकांना बसायची क्षमता असलेल्या या विमानात ऋषीराज त्याच्या फक्त दोन मित्रांसह प्रवास करत होता. तर दोन पायलट केबिनमध्ये बसून विमानाचं नियंत्रण करत होते. एअर ट्राफिक अथॉरिटीकडून या दोन्ही पायलट्सना परत फिरण्याच्या सूचना देण्यात आल्या. मात्र ही बाब विमानात पाठीमागे बसलेल्या ऋषीराजला कळू देण्यात आली नाही. 


बँकॉकला जाणारा ऋषीराज पुण्यात पोहोचला


बंगालच्या उपसागरवारून विमान परत फिरलं आणि पुन्हा थेट पुण्याच्या दिशेनं निघालं. संध्यकाळी साडेचार वाजता पुणे एअरपोर्टवरून टेकऑफ केलेलं हे विमान पुन्हा रात्री 8.45 वाजता पुणे एअरपोर्टवर पोहचलं. ऋषीराजचा समज मात्र आपण बँकॉकला पोचल्याचा होता. त्यामुळे  तो विमातून जेव्हा बाहेर आला तेव्हा त्याला धक्का बसला. कारण बँकॉकला जायला निघालेला ऋषीराज सव्वाचार तासांचा प्रवास करून पुन्हा पुण्यातच पोहचला होता. 


सामान्य व्यक्तीला हवाई प्रवासासाठी किती सोपस्कार पार पाडावे लागतात हे आपल्याला ठाऊक आहे. मात्र सत्ता आणि पैसे असतील तर सगळ्या यंत्रणा कशा वापरता येतात हे या प्रकरणातून दिसून आलं.



ही बातमी वाचा: