पुणे: पुण्यात गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर चोरीच्या घटना समोर येत आहेत. अशातच पुण्यात 8 ते 10 मेडिकल दुकानं चोरट्यांनी फोडली असल्याची माहिती समोर आली आहे. चोरट्यांनी आता सोने, चांदी, मोबाईल नव्हे तर मेडिकल दुकानांवर लक्ष केंद्रीत केल्याचं दिसून आलं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये चोरट्यांनी सोन्याची दुकाने, मोबाईलची दुकाने, चपलांची दुकाने फोडली होती. मात्र आता चोरट्यांनी पुणे जिल्ह्यातील शिक्रापूरमध्ये असलेल्या 8 ते 10 मेडिकल दुकानं फोडून चोरी केल्याची माहिती समोर आली आहे. यातील एका घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. मेडिकल दुकानांचे शटर उचकटून चोरट्यांनी असलेली रोकड लंपास केली आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील शिक्रापूरमध्ये चोरट्यांनी मेडिकल दुकानांचे शटर उचकटून अनेक दुकानात असलेली रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस केली आहे. यातील शिक्रापूरमध्ये असलेल्या एका दुकानातील ही चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. शिक्रापूर तळेगाव रोड वर असलेल्या स्वामी समर्थ मेडिकलमध्ये चोरट्यांनी रात्री 2 वाजता शटर उचकटून आतमध्ये प्रवेश केला आणि दुकानातील काउंटरमध्ये असलेली 50 हजारांची रोकड लंपास करून चोरट्यांनी तिथून पळ काढला. 


या दुकानासोबतच शिक्रापूर मलठण फाटा येथे 4 ते 5 मेडिकल दुकानं तर दुसऱ्या बाजूला शिक्रापूर चौक ते तळेगाव रोड वर असलेल्या 3 मेडिकल दुकानांमध्ये चोरट्यांनी चोरी केली असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून याप्रकरणी तपास सुरू केला असून आरोपींचा शोध सुरू झाला आहे.