पुणे: शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत याला बँकॉकला जाणाऱ्या विमानातून पुन्हा पुण्यात आणण्याच्या 'मिशन इम्पॉसिबल'च्या सुरस कथा सध्या महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात ऐकायला मिळत आहेत. तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी पत्रकार परिषदेत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला असला तरी या सगळ्या घटनाक्रमामागे सावंत कुटुंबातील वाद कारणीभूत असल्याची माहिती समोर आली आहे. याच वादातून तानाजी सावंत यांचा मुलगा बँकॉकला जात होता. मात्र, तानाजी सावंत यांनी आपली सर्व राजकीय पुण्याई पणाला लावत सगळी बंधनं झुगारुन बँकॉकला निघालेल्या मुलाला अक्षरश: हवेतून खेचून परत आणले. 


तानाजी सावंत यांच्या मुलाला परत आणण्यासाठी पोलिसांपासून ते केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयापर्यंत सगळ्या यंत्रणांनी ज्याप्रकारे हातात हात घालून काम केले, त्याची चर्चा सध्या सर्वतोमुखी आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, तानाजी सावंतांच्या घरात कौटुंबिक वाद आहेत. ऋषिराज सावंत (Rishiraj sawant) याने सोमवारी बँकॉकला जाण्यासाठी चार्टर्ड विमान बुक केले होते. त्यावरुन आदल्या दिवशी सावंत यांच्या घरात वादही झाला होता. त्यानंतरही ऋषिराज आपल्या मित्रांसोबत पुण्याच्या लोहगाव विमानतळावरुन बँकॉकला जाण्यासाठी विमानात बसला. मुलाने सांगूनही ऐकलं नाही, हे लक्षात आल्यानंतर तानाजी सावंत यांनी दुसरा मार्ग वापरायचा ठरवला. तानाजी सावंत यांना त्यांच्या ड्रायव्हरने आपण ऋषिराजला विमानतळावर सोडून आल्याचे सांगितले. तोपर्यंत ऋषिराज याच्या विमानाने बँकॉकच्या दिशेने हवेत झेप घेतली होती. 


त्यावेळी तानाजी सावंत यांच्यातील कसलेला राजकारणी जागा झाला. तानाजी सावंत यांनी प्रथम पुणे पोलिसांशी संपर्क साधला. उड्डाण केलेल्या विमानाला पुन्हा पुण्यात आणायचे असल्यास काहीतरी ठोस कारण देण्याची गरज होती. त्यामुळे तानाजी सावंत यांनी सर्वप्रथम सिंहगड पोलीस ठाण्यात ऋषिराजचे अपहरण झाल्याची तक्रार दिली. ही बातमी बाहेर पसरल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर तानाजी सावंत यांना त्यांच्या सर्वपक्षीय राजकीय संबंधांचा फायदा झाला. ऋषिराज सावंत याचे विमान पुन्हा पुण्याला आणण्यात केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाच्या (ATC) माध्यमातून ऋषिराज सावंतच्या चार्टर्ड प्लेनच्या वैमानिकाशी संपर्क साधला. एटीसीने चार्टर्ड प्लेनच्या वैमानिकाशी संपर्क साधला तेव्हा विमान बंगालच्या उपसागरावरुन उड्डाण करत होते. एटीसीने वैमानिकाला तुला विमान घेऊन माघारी फिरायच्या सूचना दिल्या. ऋषिराजला या गोष्टीचा थांगपत्ताही लागून देण्यात आला नाही. अखेर विमान यूटर्न घेऊन पुण्यातील लोहगाव विमानतळाच्या धावपट्टीवर उतरले तेव्हा बाहेरचे दृश्य बघताच ऋषिराजला आश्चर्याचा धक्का बसला. हा संपूर्ण घटनाक्रम एखाद्या चित्रपटात शोभेल असा होता. 



आणखी वाचा


8 दिवसांपूर्वी दुबईवारी, आता 68 लाखांचं बिल, पप्पा रागावतील म्हणून.... तानाजी सावंतांच्या लेकाची इनसाईड स्टोरी