पुणे : मुद्देमाल घेऊन समोरून चोरटे जात असतानाही त्यांना अटकाव न करता स्वतः पळून जाणाऱ्या पुणे पोलीस दलातील त्या दोन पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. औंध येथील सोसायटीत 28 जानेवारीच्या पहाटे घडलेला प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला होता. या घटनेचा सीसीटीव्ही सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलीस दलाची प्रतिमा मलीन झाल्याचा ठपका ठेवत या दोघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.


पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी या संदर्भातील आदेश काढला आहे. पोलीस हवालदार प्रवीण रमेश गोरे आणि पोलीस नाईक अनिल दत्तू अवघडे अशी या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.


औंध येथील शैलेश टॉवर या सोसायटीत शिरलेल्या चोरांची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला दिली होती. माहिती मिळाल्यानंतर दोन पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखलही झाले. परंतु त्यांनी या चोरांना रोखले नाही किंवा त्यांना पकडण्याचा प्रयत्नही केला नाही. उलट त्यातील एक कर्मचारी चोरांना पाहून पळून गेला. या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी कर्तव्य करीत असताना केलेला निष्काळजीपणा, बेजबाबदारपणा आणि भित्रेपणा यामुळे पोलिस खात्याची जनमानसातील प्रतिमा मलिन करणारी असल्यामुळे या दोघांनाही शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.


पुण्यातल्या औंध भागामध्ये सिद्धार्थ नगर भागातील शैलेश टॉवर सोसायटीमध्ये काल रात्री तीनच्या सुमारास चोर शिरले होते. त्यांनी बंद केलेल्या चार फ्लॅटचे कुलूप तोडले आणि पाचव्या फ्लॅटमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न सुरू असताना नागरिकांनी तातडीने पोलिसांना फोन करून घटनास्थळी येण्याची विनंती केली. यावेळी काही मिनिटात पोलीस सोसायटी बाहेर दाखल झाले मात्र समोरून चोर आल्याचे बघून पोलीसच पळून गेले. इतकेच नव्हे चोरांच्या हातातील हत्यार बघून दुचाकी चालवणारा पोलीस आपल्या साथीदार पोलिसालाही तिथेच सोडून पळाले. पोलिसांची ही हालचाल सीसीटीव्ही मध्ये कैद झाली. या वेळी सोसायटीच्या वॉचमनच्या गळ्याला चोरांनी चाकू लावून ठेवला होता.


संबंधित बातम्या :



आता बोला! चोरांना बघून चक्क पोलिसचं पळाले, घटना सीसीटिव्हीत कैद