पुणे : पोलिसांना बघून चोराने पळून जाणं काहीस सामान्य असताना पुण्यात मात्र चक्क चोर बघून पोलिसच पळून गेल्याची घटना घडलेली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून त्यात चोरांना बघून धूम ठोकणारे पोलीस कर्मचारी कैद झाले आहेत. दरम्यान या घटनेची दखल आता चतुःशृंगी पोलिसांनी घेतली असून संबंधित पोलिसांचा अहवाल आयुक्तांकडे पाठवण्यात आला आहे.
ही घटना घडली पुण्यातल्या औंध भागामध्ये सिद्धार्थ नगर भागातील शैलेश टॉवर सोसायटीमध्ये काल रात्री तीनच्या सुमारास चोर शिरले. त्यांनी बंद केलेल्या चार फ्लॅटचे कुलूप तोडले आणि पाचव्या फ्लॅटमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न सुरू असताना नागरिकांनी तातडीने पोलिसांना फोन करून घटनास्थळी येण्याची विनंती केली. यावेळी काही मिनिटात पोलीस सोसायटी बाहेर दाखल झाले मात्र समोरून चोर आल्याचे बघून पोलीसच पळून गेले आहेत.
इतकेच नव्हे चोरांच्या हातातील हत्यार बघून दुचाकी चालवणारा पोलीस आपल्या साथीदार पोलिसालाही तिथेच सोडून पळाला आहे. पोलिसांची ही हालचाल सीसीटीव्ही मध्ये कैद झाली. या वेळी सोसायटीच्या वॉचमनच्या गळ्याला चोरांनी चाकू लावून ठेवला होता.
या दोन्ही पोलीस कॉन्स्टेबलच्या विरोधात स्थानिक लोकांनी चतुश्रृंगी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. त्यानंतर तातडीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी या दोघांचा चौकशीचे आदेश दिले आणि या दोघांचाही अहवाल पुणे पोलीस आयुक्तांना देण्यात आला आहे. मात्र या दोघांवर आता काय कारवाई होतं हे पाहणं महत्त्वाचा असेल
दरम्यान यातले चार फ्लॅट बंद असल्याने मोठा ऐवज चोरीला गेला नाही. पण एका फ्लॅटमधील एलईडी टीव्ही नेण्यास चोर यशस्वी झाले. संकटाच्यावेळी तारणहार असलेले पोलीस जर पळून जात असतील तर नागरिकांनी कोणावर विश्वास ठेवायचा असा प्रश्न आता स्थानिक विचारत आहेत.