Sushma Andhare vs Shambhuraj Desai : पुण्यातील एका नामांकित हॉटेलमध्ये ड्रग्ज विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एफसी रोडवरील (FC Road) एका नामांकित हॉटेलमधील व्हिडीओ व्हायरल झाल्याने पुण्यातील ड्रग्ज प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आहे. या प्रकारावरून राजपूत नावाच्या अधिकाऱ्याला महिन्याला तीन कोटी रुपये मिळतात, ते मंत्र्यांना पोहचात. तो हप्ता शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांना जातो, असा आरोप आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी केला. तर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) आणि राज्य उत्पादन शुल्क कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई यांच्यात या प्रकरणावरून चांगलीच खडाजंगी झाल्याचे दिसून आले.
एबीपी माझाशी संवाद साधताना सुषमा अंधारे यांनी पुण्यातील ड्रग्ज प्रकरणावर आम्ही तब्बल आठ ते नऊ महिन्यापासून सातत्याने भूमिका मांडत आहोत. जेव्हा कोट्यवधींचे ड्रग्जचे साठे सापडले होते. तेव्हाही आम्ही शंभुराजे देसाई आणि गृहमंत्र्यांना प्रश्न विचारले होते. शंभूराज देसाई यांनी तात्काळ आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे. शंभूराज देसाई यांच्यासाठी करणारे उत्पादन शुल्कचे अधिकारी राजपूत यांचेही निलंबन झाले पाहिजे. हे झाल्याशिवाय पुणे सुधारणार नाही, असे त्यांनी म्हटले.
सुषमा अंधारे आणि शंभूराज देसाईंमध्ये खडाजंगी
यानंतर शंभूराज देसाई एबीपी माझाशी संवाद साधण्यासाठी फोनवरून जोडले गेले. यावेळी देसाई आणि अंधारे यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. शंभूराज देसाई म्हणाले की, सुषमा अंधारेंनी आम्ही काय म्हणत आहे ते घेतले पाहिजे. आता मी थोडं स्पष्टच बोलतो. यावर सुषमा अंधारे म्हणाल्या, तुम्हाला काही स्पष्टपणे बोलता येत नाही. तुम्हाला फक्त पैसे गोळा करता येतात, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले.
यावर शंभूराज देसाई म्हणाले, तुमचे म्हणणे आम्ही शांतपणे ऐकून घेतले. आता आमचे म्हणणेदेखील शांतपणे ऐकून घ्या. हा व्हिडिओ मी आताच पहिला आहे. याची चौकशी आम्ही करू. आमदार धंगेकर आणि सुषमा अंधारे यांनी जो प्रश्न उपस्थित केला आहे. गेल्या महिन्याभरात आपण पुण्यात 49 हॉटेल आणि बारवर कारवाई केली आहे. तसेच पुण्यात सरप्राईज चेकिंग देखील सुरु करण्यात आले आहे. या प्रकारची गंभीर दखल घेऊन चौकशी करणार आहे. तेथील क्षेत्रीय अधिकाऱ्याचीही चौकशी करणार आहोत, असे आश्वासन शंभूराज देसाई यांनी दिले.
यावर सुषमा अंधारे म्हणाल्या की, क्षेत्रीय अधिकारी म्हणून तुम्ही खालच्या अधिकाऱ्याला का बोलत आहात. तुम्ही राजपूतचे लाड का करत आहात? त्याला का पाठीशी घातले जात आहे? असा सवाल यावेळी सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला. यावर शंभूराज देसाई म्हणाले की, कुठल्याही अधिकाऱ्याबरोबर सरकारचं साटंलोटं नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल. जो अधिकारी यात दोषी आढळेल, त्यावर कारवाई केली जाईल, असे त्यांनी म्हटले.
आणखी वाचा