पुणे: गुलेन बॅरी सिंड्रोम (Guillain Barre Syndrome) च्या रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्याचबरोबर दोन संशयितांचा मृत्यू झाला आहे. रूग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका अॅक्शन मोडवर आली आहे. ज्या भागात जास्त रूग्णसंख्या आढळली आहे, अशा ठिकाणचे पाण्याची ठिकाणे आणि त्यांचे नमुने तपसाले जात आहेत, अशातच समाविष्ट गावांमध्ये सर्वेक्षण, विहिरीच्या पाण्यात क्लोरिनची मात्रा वाढवणे, सांडपाणी वाहिन्यांची दुरुस्ती, ऑक्सिजन व व्हेंटिलेटर खाटांची उपलब्धता, रुग्णांना मोफत उपचार, रुग्णांच्या नातेवाईकांचे समुपदेशन ते विविध प्रकारच्या उपाययोजना महापालिकेकडून तातडीने केल्या जात आहेत.


23 हजार घरांचे सर्वेक्षण पूर्ण 


महापालिकेकडून जीबीएसबाबत (Guillain Barre Syndrome) 23 हजार घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आलेले आहे. सर्वेक्षण केल्या जाणाऱ्या गावांमध्ये 20 हजार मेडिक्लोअरच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर योग्य ती खबरदारी घ्यावी, पाणी उकळून आणि गाळून प्यावं असं आवाहन खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची होणारी आर्थिक लूट थांबवण्यासाठी संबंधित रुग्णालयांवर अधिकाऱ्यांद्वारे वैद्यकीय लक्ष ठेवण्यात येणार आहे, असे पुणे महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले.


महापालिकेकडून उपाययोजना अन् अंमलबजावणीवर भर


जीबीएस संदर्भात महापालिकेकडून जनजागृती, तत्काळ उपाययोजना व त्यांची अंमलबजावणी, गावांमध्ये करण्यात येणारी कामे, आजारासंबंधी नियंत्रण कक्षाची निर्मिती करुन रुग्णांना वैद्यकीय मदत देण्यावर भर दिला जाणार आहे. याबरोबरच रुग्ण व नातेवाईकांचे समुपदेशन करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. कमला नेहरू रुग्णालयात अतिदक्षता विभागात 15 खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच महापालिकेकडून चार मेंदूविकार तज्ज्ञांची तात्पुरती नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वेक्षणावेळी वीस हजार मेडिक्लोअरच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आलं असून प्रत्येक घरामध्ये पाणी उकळून व गाळून पिण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.


भारत विरुद्ध इंग्लंड टी ट्वेंटी सामन्यावरही जीबीएसचं सावट


पुण्यात उद्या होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड टी ट्वेंटी सामन्यावर ही जीबीएसचा (Guillain Barre Syndrome) सावट आहे. या सामन्यासाठी परदेशातूनही हजारो प्रेक्षक येण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर जीबीएस चा प्रादुर्भाव वाढणार नाही या अनुषंगाने राज्य सरकारने खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन कडून योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहेत तीन-तीन वेळा फिल्टर करून वापरला जाणार आहे. तर लॉन आणि वापरासाठी शुद्ध पाणी वापरला जाणार आहे. जेणेकरून प्रेक्षकांना जीबीएसचा धोका उद्भवणार नाही.


काय काळजी घ्यावी


पाणी उकळून व गाळून प्यावे.
उघड्यावरील व शिळे अन्न खाणे टाळावे.
अचानकपणे हातापायाच्या स्नायूंमध्ये अशक्तपणा जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा किंवा जवळील शासकीय रुग्णालयात जावे.


कॅम्पिलोबॅक्टरमुळे जीबीएस कसा होतो?


दूषित पाणी किंवा अन्न खाल्यावर कॅम्पिलोबॅक्टर जेजुनीचा संसर्ग होऊ शकतो.
संसर्गामुळे अतिसार आणि ओटीपोटात वेदना होऊ शकतात.
काही व्यक्तींमध्ये प्रतिकारशक्ती मज्जातंतूंना लक्ष्य करते. ज्यामुळे १ ते ३ आठवड्यांच्या आत जीबीएसचे निदान होते.
याशिवाय, डेंग्यू, चिकनगुनियाचे विषाणू किंवा इतर बॅक्टेरियाच्या संक्रमणामुळे मज्जातंतूंविरुद्ध रोगप्रतिकारक शक्ती हल्ला करते.


कॅम्पिलोबॅक्टर संसर्गाची लक्षणे


अतिसार
पोटदुखी
ताप
मळमळ किंवा उलट्या