पुणे: पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोम (Guillain Barre Syndrome) च्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. जीबीएसच्या रुग्णांची संख्या 127 वर पोहोचली आहे. 20 रुग्ण सध्या व्हेंटिलेटरवर आहेत. 20 ते 29 वयोगटातील सर्वाधिक रुग्ण आहेत. एकाच दिवसात 16 रुग्णांची नोंद झाल्याने आता चिंता वाढली आहे. दोन संशयितांच्या मृत्यूची नोंद देखील करण्यात आली आहे. पुणे शहर परिसरात आढळून आलेल्या जीबीएस (Guillain Barre Syndrome) रुग्णांपैकी जवळपास 80 टक्के रुग्ण हे सिंहगड रस्ता परिसरात आढळून आले आहेत. दरम्यान वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर या भागामध्ये महापालिकेच्या पथकांनी अतिसार, उलट्या अशी लक्षणे असलेल्या रुग्णांचे सर्वेक्षण केले होते. केंद्रीय उच्चस्तरीय पथकाने बुधवारी महापालिकेच्या सर्वेक्षण पथकांकडून पुन्हा या रुग्णांचे तातडीने सर्वेक्षण करून घेतले. रुग्णसंख्या वाढीच्या नेमक्या कारणांचा शोध घेण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आल्याची माहिती आहे.
शहरातील जवळपास 80 टक्के रूग्ण सिंहगड परिसरातील
पुणे शहर परिसरात आढळून आलेल्या जीबीएस (Guillain Barre Syndrome) रुग्णांपैकी जास्त रुग्ण हे सिंहगड रस्ता परिसरात आढळून आलेले आहेत. या परिसरामध्ये महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकांनी रूग्ण आढळल्यानंतर घरोघरी जाऊन संशयित रुग्णांचे सर्वेक्षण केले होते. त्यात अतिसार, उलट्या अशी लक्षणे असलेल्या रुग्णांची माहिती घेण्यात आलेली होती. या सर्वेक्षणात अशी लक्षणे असलेले एकूण 144 रुग्ण आढळून आले होते. केंद्रीय उच्चस्तरीय पथकाने बुधवारी सिंहगड रस्ता परिसरातील पाण्याचे स्त्रोत असलेल्या घटकांची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकांची बैठक घेतली. यावेळी बैठकीमध्ये आरोग्य विभागाच्या पथकांना रुग्णांचे फेरसर्वेक्षण करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
उच्चस्तरीय पथकाने सर्वेक्षणात नेमक्या कोणत्या गोष्टी करणे अपेक्षित आहेत, काय माहिती घ्यावी, कशा पद्धतीने सर्वेक्षणाची माहिती गोळा करावी, याची माहिती सर्वेक्षण पथकांना दिली आहे. त्यानंतर तातडीने सर्वेक्षण पथकांना फेरसर्वेक्षण सुरू करण्यास सांगण्यात आले. या पथकांकडून दिवस अखेरीस सर्वेक्षणाचे अहवाल उच्चस्तरीय पथकाने मागवले आहेत. यात रुग्णांची लक्षणे आणि रुग्णांना नेमकी बाधा कशामुळे झाली, यावर उच्चस्तरीय पथकाने भर दिला असल्याची माहिती समोर आली आहे.
सुळे नांदेड गावातील दूषित पाण्याच्या विहिरीला देणार भेट
बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे नांदेड गावातील दूषित पाण्याच्या विहिरीला भेट देणार आहेत. विहिरीतील दूषित पाण्यामुळे जीबीएस आजार वाढल्याने त्या भेट देणार आहेत. सकाळी पावणे आठ वाजता सुप्रिया सुळे भेट देणार असून गावकऱ्यांशी देखील त्या संवाद साधणार आहेत. नांदेड गाव हे सुप्रिया सुळेंच्या बारामती लोकसभा मतदारसंघात आहे.
काय काळजी घ्यावी
पाणी उकळून व गाळून प्यावे.
उघड्यावरील व शिळे अन्न खाणे टाळावे.
अचानकपणे हातापायाच्या स्नायूंमध्ये अशक्तपणा जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा किंवा जवळील शासकीय रुग्णालयात जावे.
कॅम्पिलोबॅक्टरमुळे जीबीएस कसा होतो?
दूषित पाणी किंवा अन्न खाल्यावर कॅम्पिलोबॅक्टर जेजुनीचा संसर्ग होऊ शकतो.
संसर्गामुळे अतिसार आणि ओटीपोटात वेदना होऊ शकतात.
काही व्यक्तींमध्ये प्रतिकारशक्ती मज्जातंतूंना लक्ष्य करते. ज्यामुळे १ ते ३ आठवड्यांच्या आत जीबीएसचे निदान होते.
याशिवाय, डेंग्यू, चिकनगुनियाचे विषाणू किंवा इतर बॅक्टेरियाच्या संक्रमणामुळे मज्जातंतूंविरुद्ध रोगप्रतिकारक शक्ती हल्ला करते.
कॅम्पिलोबॅक्टर संसर्गाची लक्षणे
अतिसार
पोटदुखी
ताप
मळमळ किंवा उलट्या