Daund Success Story : देशसेवा करत असताना वीर मरण आलेल्या सैनिकाच्या पत्नीने जिद्दीने संकटावर मात करत पुणे ग्रामीण पोलीसाची नोकरी मिळवली आहे. पोलीस भरतीची मैदानी चाचणीच्या आदल्या दिवशी भावाचा अचानक मृत्यू झाला. त्यावर मात करीत दौंड तालुक्यातील पारगाव येथील अजिता भागवत बागडे या वीर पत्नीने पोलीस भरतीत यश मिळवले. तिच्या कामगिरीबद्दल त्यांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. 


अजिता यांच्या पतीचे काश्मिर येथे 2017 साली कर्तव्यावर असताना ऑक्सिजन अभावी निधन झाले. तरीही न खचता अजीता यांनी दोन मुलांचा सांभाळ करून पोलीस भरतीत यश मिळवलं. त्यांची आता पुणे ग्रामीण पोलीस दलात निवड झाली आहे.  वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी वडिलांचे छत्र हरपले. दहावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर अजिता यांचे सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील भागवत बागडे यांच्याशी विवाह झाला. त्यानंतर त्यांना दोन अपत्य झाली. चौदा वर्षे देशसेवा केल्यानंतर 6 एप्रिल 2017रोजी कारगिल येथे ऑन ड्युटी असताना ऑक्सिजनच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे भागवत यांचा आकस्मित मृत्यू झाला. यावेळी अजिता यांचा मोठा मुलगा तन्मय 3 वर्षाचा तर लहान मुलगा हर्ष 1 वर्षाचा होता. दोन्ही मुलं सांभाळत त्यांनी पोलीस भरतीची तयारी सुरू केली मात्र भरतीला जात असताना 15 जानेवारीला अजिता यांच्या मोठ्या भावाचं निधन झालं. तरी घरच्यांनी आधार देत त्यांना पोलीस भरतीला पाठवलं आणि त्या पुणे ग्रामीण पोलिस दलात भरती झाल्या. संपूर्ण कुटुंबिंयांचा सांभाळ करत त्यांनी हे यश खेचून आणल्याचं अजिता यांचे चुलते विनायक पोटे सांगतात. 


कुटुंबियांचा मोठा आधार...


अजिता बागडे यांनी जेव्हा भरतीला सुरुवात केली त्यावेळी त्यांची मुले पुण्यात शिकत होती. अजिता यांच्या आईने त्यांच्या मुलांचा सांभाळ केला आणि अजिता या पारगाव येथील शाळेच्या मैदानावर सराव सुरू केला. सुरुवातीच्या काळात त्यांना मैदान पार करणे अवघड जात होते परंतु अजिता यांना विजय पंडित यांनी त्यांना मैदानी चाचणीत मदत केली केली. त्यांनी सगळे आघात झेलले आहे. आयुष्याची परिक्षा हसत हसत पास केली असल्याचं त्यांची आई संगीता पोटे आणि प्रसिक्षक विजय पंडित सांगतात. 


गावकऱ्यांकडून कौतुक


अजिता यांनी मिळवलेल्या यशावर गावकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यांनी गावाचं नाव मोठं केलं आणि अनेक तरुणांसाठी प्रेरणा बनल्याचं गावकरी रामकृष्ण ताकवणे सांगतात. 'लहानपणापासून देश सेवेची आवड होती. पतीच्या मृत्यूनंतर मी अधिकाधिक खंबीर बनले. गाव सोडून पुणे येथे स्थानिक होण्याचा निर्णय घेतला. स्वतः क्वार्टरमध्ये राहुन मुलांना इंग्रजी शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. भविष्यामध्ये नोकरीच्या रुपाने देश सेवा करून मुलांना अधिकारी बनवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं अजिता सांगतात.