Ashadhi Wari 2023 : देहू देवस्थाननंतर आता आळंदी देवस्थानने (Alandi Devasthan) ही आषाढी पालखी सोहळ्याची घोषणा केली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी (Sant Dnyaneshwar Palkhi) 11 जूनला आळंदीमधून (Alandi) प्रस्थान करेल. तर पायी प्रवास करुन 28 जूनला पालखी पंढरपूरमध्ये (Pandharpur) पोहचेल आणि 29 जूनला संत ज्ञानेश्वर माऊलींची विठुरायांशी (Vitthal) भेट घडेल. वारकरी सांप्रदायाला याच क्षणाची आस लागलेली असते. देवस्थानने त्याच पायी वारीची घोषणा केल्याने वारकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
कसा असेल आषाढी वारी पालखी सोहळा?
सोहळ्यात श्रींचा पालखी सोहळा पुण्यनगरीत दोन दिवस पाहुणचार घेत 14 जूनला सासवड मुक्कामास दिवे घाटातून हरिनाम गजरात मार्गस्थ होईल. 14 आणि 15 जूनला सासवड मुक्काम, 16 जूनला जेजुरीकडे प्रस्थान, 17 जूनला जेजुरीला मुक्काम, 18 जूनला लोणंद येथे सोहळा विसावेल. 19 जूनला अधिक एक दिवसाचा मुक्काम आणि 20 जूनला तरडगाव, 21 जूनला फलटणकडे प्रस्थान आणि 22 जूनला फलटणमध्ये मुक्काम, 23 जूनला नातेपुते, 24 जूनला माळशिरस मुक्काम, 25 जूनला वेळापूर, 26 जूनला भंडी शेगाव, 27 जूनला वाखरी, 28 जूनला पंढरपूर, 29 जूनला आषाढी एकादशी सोहळा साजरा होईल. पालखी सोहळ्यात फलटण येथे 21 जून, बरड येथे 22 जूनला एक दिवसांच्या मुक्कामासाठी सोहळा विसावणार आहे.
21 जूनला फलटणकडे प्रस्थान आणि मुक्काम होईल. 22 जूनला बरड मुक्काम असेल. दिनांक 3 जुलै पौर्णिमेपर्यंत सोहळा पांढरी नगरीत विसावेल. 3 जुलैला गोपालकाला होऊन सोहळा परतीच्या प्रवासासाठी अलंकापुरीकडे निघणार आहे. आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई आणि विश्वस्त मंडळ यांचे मार्गदर्शनात सोहळ्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. वारकरी भाविक यांची सोहळ्यात गैरसोय होऊ नये याची काळजी घेण्याचे दृष्टीने नियोजन करण्यात येत असल्याचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले.
जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या आषाढी पालखी सोहळ्याची घोषणा, 10 जूनला पंढरपूरसाठी प्रस्थान
यंदा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी देहूतून 10 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. 28 जून रोजी संत तुकारामांची पालखी पंढरीत दाखल होणार आहे. पालखी सोहळा प्रमुख भानुदास महाराज मोरे, देहू देवस्थानाचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यांनी आज पालखी सोहळ्याबाबतची माहिती दिली. यंदा पालखी सोहळ्याचे 338 वे वर्ष आहे. संत तुकारामांच्या पालखी सोहळ्याची हजारो विठ्ठल भक्त प्रतिक्षा करत असतात. मागील वर्षी कोरोना महासाथीची लाट ओसरल्यानंतर पारंपरीक पद्धतीने वारी सुरु करण्यात आली होती. इनामदार वाड्यात पालखीचा पहिला मुक्काम करणार आहे.