पुणे : जिद्द, चिकाटी आणि ध्येय गाठण्याची प्रबळ इच्छाशक्ती असेल तर काहीच अशक्य नाही हे पुण्यातील चिन्मय मोकाशी या विद्यार्थ्याने दाखवून दिलं आहे. चिन्मयला सेरेब्रल पाल्सी आहे. काही वर्षांपुर्वी तो नीट चालूही शकत नव्हता. पण हे अडथळे त्याच्या शिक्षण पुर्ण करण्याच्या जिद्दीला हरवू शकले नाहीत. पुना नाईट स्कूल आणि ज्यूनिअर काॅलेजमधून त्याने बारावीचं शिक्षण घेतलं आणि काॅमर्स शाखेतून 74.61 टक्के गुण मिळवले.
चिन्मयला सेरेब्रल पाल्सी असल्याने तो चालू शकत नाही. तसंच तो लिहू पण शकत नाही. त्याचे आई- वडील दोघेही नोकरी करत असल्याने त्याला रात्रशाळेत घेऊन जाणं त्यांना जास्त सोयीचं होतं. त्यामुळे आठवी पासून चिन्मय हा रात्रशाळेतच शिक्षण घेतोय. चिन्मय सोबत त्याचे आई किंवा वडील वर्गात बसून नोट्स काढायचे. मग चिन्मय ते पाठ करायचा. त्याचं पाठांतर चांगलं असल्याने त्याला अभ्यास करणं कठीण गेलं नाही असं त्याच्या पालकांनी सांगितलं.
पण बारावी पुर्ण करुन थांबायचं नसल्याचं चिन्मयने सांगितलं. त्याला बी कॉमची पदवी पुर्ण करायची आहे. चिन्मयला मराठी हा विषय सोपा वाटायचा तर अकाऊंट हा विषय थोडा कठीण गेला. नियोजनबद्ध अभ्यासाच्या भरोशावर त्याने बारावीचा महत्त्वाचा टप्पा पार केला. चिन्मयला मिळालेल्या यशाने त्याच्या पालकांसोबत त्याच्या शिक्षकांनाही आनंद झाला आहे.
राज्याचा बारावीचा निकाल 90.66 टक्के लागला आहे, जो गेल्यावर्षीच्या तुलनेत 4.78 टक्क्यांनी वाढला आहे. मागील वर्षी हा निकाल 85.88 टक्के लागला होता. तर दिव्यांग विद्यार्थांचा निकाल 93.57 टक्के लागला आहे.
संबंधित बातम्या :
Maharashtra HSC Results 2020 | सर्वांना उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा : मुख्यमंत्री
HSC Results | बारावीच्या निकालात कोकणची बाजी तर नागपूरच्या चैतन्य अय्यरचे घवघवीत यश