मावळ, पुणे : मावळ लोकसभेत महायुतीमध्ये (Maval Loksabha election) खदखद आहे, ही चर्चा सर्वत्र रंगलेली आहे. अशातच श्रीरंग बारणेंचा (Shrirang Barne) प्रचार नेमका कसा सुरु आहे, हे प्रत्यक्षात पाहण्यासाठी दिल्लीचं एक पथक मावळ लोकसभेत आलं आहे. याबवत प्रसारमाध्यमांना प्रसिद्धी पत्रकाद्वारे बारणेंच्याच टीमने कळवलं होतं. मात्र मला याबाबतची कल्पना नाही, ते पथक माझ्यापर्यंत आलं नाही, असं म्हणत बारणेंनी आता सावध भूमिका घेतली आहे.
महायुतीची प्रत्येक जागा ही महत्वाची आहे. त्यामुळे एनडीए आघाडीकडून सगळ्या बारीकसारीक गोष्टींकडे लक्ष ठेवण्यासाठी काही लोक आले असतील. पण या पथकासंदर्भात मला कोणतीही माहिती नाही. एनडीएची निवडणूक यंत्रणा चांगली काम करते. मी माझ्या वरिष्ठांना प्रचाराची माहिती देतो. शिवाय तेदेखील फोनवरुन प्रचाराची माहिती घेतात. अनेक विषयांवर चर्चा करतात आणि विचारपूसदेखील करतात. मात्र केंद्राचं असं कोणतं पथक आल्याची मला कोणतीही माहिती नसल्याचं बारणेंनी सांगितलं आहे.
मविआचे उमेदवार संजोग वाघेरेंना( Sanjog Waghere) मतदारसंघात कोणी ओळखत नाहीत, असं बारणे अनेकदा म्हणतात. मग अनोळखी उमेदवाराच्या पराभवासाठी मोदींची गरज का भासली? तसेच संजोग पाटील या अपक्ष उमेदवाराला तुम्हीच रिंगणात उतरवलं का? या प्रश्नांचा खुलासा ही बारणेंनी केला.
विरोधी उमेदवार असलेल्या संजोग वाघेरेंना पाडण्यासाठी पंतप्रधानांच्या सभेची गरज होती का?, असं विचारल्यास ते म्हणाले की, देश स्वतंत्र झाल्यानंतर पासून चा इतिहास आहे. केंद्रीय नेतृत्व नेते सभा घेतात. इंदिरा गांधींची सभा झाली होती. राजीव गांधींची सभा झाली. मनमोहन सिंहची सभा झाली. प्रत्येक निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील सभेसाठी आले आहेत. पुणे जिल्ह्यातील चार मतदारसंघाच्या उमेदवारांसाठी मोदींनी सभा घेतली. त्यांच्या सभेला मोठी गर्दी झाली होती. या सभेमुळे नक्की मतदानात फरक पडेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
केंद्रिय पथक नेमकं काय करणार?
बारणे यांचे मताधिक्य वाढवण्यासाठी प्रामाणिकपणे आणि जीव तोडून काम करीत असलेले पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या कामांची नोंद या पथकामार्फत घेतली जाणार आहे. पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या कामगिरीची चार श्रेणीमध्ये विभागणी करण्यात येणार आहे. सर्वोत्कृष्ट श्रेणीमध्ये आपले नाव राहावे यासाठी स्पर्धा लागल्याचे दिसून येत आहे. महायुतीच्या घटकांमध्ये काही कार्यकर्ते वैयक्तिक राजकीय महत्त्वाकांक्षांपोटी प्रचारापासून अलिप्त राहत आहेत किंवा विरोधात काम करत असल्याचे दिसत आहे. प्रत्यक्ष माहिती घेऊन अशा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची नावे चौथ्या श्रेणीत अर्थात 'ब्लॅक लिस्ट'मध्ये असणार आहेत. त्या संदर्भातील अहवाल संबंधित घटक पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनाही देण्यात येणार आहे. महायुतीच्या वतीने यापुढे ब्लॅक लिस्ट मधील कोणत्याही व्यक्तीला संधी देण्यात येणार नाही, असा इशारा टीमकडून देण्यात आला आहे.
इतर महत्वाची बातमी-
कुठे ऊन, कुठे पाऊस! ठाणे, मुंबईत उन्हाच्या झळा, IMD कडून यलो अलर्ट; विदर्भ, मराठवाड्यात पाऊस