मुंबई : देशातील विविध राज्यांमध्ये उन्हाच्या झळा (Heat Wave) बसत आहेत. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा (Unseasonal Rain) देण्यात आला असला तरी काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट असण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबई, ठाणे शहरात हवामान विभागाने पुढील 24 तासात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. मुंबई, ठाणेसह कोकणात उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे.
मुंबईसह कोकणात उन्हाच्या झळा
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये येत्या काही दिवसांत उष्मा वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या जिल्ह्यांतील नागरिकांना पुन्हा एकदा कडाक्याच्या उन्हाचा सामना करावा लागणार असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे. त्याचवेळी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यात अनेक जिल्ह्यात पारा 40 पार
गेल्या दोन दिवसात महाराष्ट्रातील अनेक भागात तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअस पलिकडे गेला आहे. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्याच्या पश्चिम आणि मध्य भागात सर्वाधिक उच्च तापमानाची नोंद झाली आहे. आज बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी रायगड, मुंबई उपनगर आणि ठाण्यासह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबईचे हवामान कसे असेल?
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात आजपासून पुढील 24 तासात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर विदर्भातील अहमदनगर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात विविध ठिकाणी जोरदार वाऱ्यासह हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याचा इशारा देण्यात आला आहे.
ठाणे, रायगड आणि मुंबईच्या अनेक भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता मुंबई हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.