पुणे : सर्वसामान्य घरातून पुढे येऊन स्कायडायव्हिंग क्षेत्रात वेगवेगळे विश्वविक्रम प्रस्थापित करणाऱ्या पुणे शहराची रहिवासी असलेली पदमश्री शीतल महाजन (Shital Mahajan) नवीन विक्रम प्रस्थापित करण्यास सज्ज झाली आहे. रिलायन्स फाऊंडेशनच्या सहाकार्याने जगातील सर्वाच्च शिखर असलेल्या नेपाळ स्थित माऊंट एव्हरेस्ट (8848 मी) (Mount Everest) समोर 23 हजार फुट उंचीवरुन हेलिकॉप्टरमधून ऐतिहासिक पॅराशूट जंप करणार आहे.
हवामानाच्या परिस्थितीनुसार 7 ते 15 नोव्हेंबर दरम्यान हा विश्वविक्रम प्रस्थापित केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त सुरु केलेल्या 'बेटी की उडान,देश का स्वाभिमान' या घोषणेपासून प्रेरित होऊन इतकी मोठी मोहीम करण्याचे धाडस करण्यात येणार आहे. ही मोहीम केवळ व्ययक्तिक प्रयत्न नसून जागतिक स्तरावर भारतीय महिलांचे प्रतिमेचे प्रतिनिधीत्व करणारी आहे.
याबाबत शीतल महाजन म्हणाल्या की, यापूर्वी मी 2004 मध्ये उत्तर ध्रृवावर आणि 2006 मध्ये दक्षिण ध्रुवावर तर 2018मध्ये जगातील सात खंडावर स्कायडायव्हिंग करुन विश्वविक्रम केला आहे. सन 2007 पासून माऊंट एव्हेरस्टच्या समोर पॅराशूट उडी मारण्याबाबतचे स्वप्न मी पाहिले होते. रिलायन्स फाऊंडेशनच्या मदतीने ते पूर्णत्वास आता जात आहे. बर्फाच्छादित माऊंट एव्हरेस्ट येथे स्कायडायव्हिंगसाठी विशेष पॅराशूट उपकरणे आवश्यक आहे, या सर्वांची सराव चाचणी मागील आठवडयात अमेरिकेत एरिझोना येथे करण्यात आली आहे.
माऊंट एव्हरेस्टच्या समोर 23 हजार फूट उंचीवरुन एएस 350 बी-3 या हेलिकॉप्टर मधून संबंधीत पॅराशूट जॅम्प केली जाणार आहे. यामध्ये हेलीकॉप्टर मधून उडी मारल्यानंतर पक्ष्यासारखे आकाशात विहरत 16 हजार ते 18 हजार फूट उंचीवर पॅराशूट उघडले जाणार आहे. माऊंट एव्हरेस्ट सर करताना तीन महत्वपूर्ण टप्पे समजले जातात. स्यांगबोचे (12,402 फूट), अमादाबलम बेस कॅम्प (15,000 फूट) व कालापत्थर (17,000 फूट) याठिकाणी देखील यावेळी पॅराशूट जंप हेलिकॉप्टर मधून करुन लँडिग केले जाणार आहे. सदर उंचीवर 260 ते 400 चोरस फूटचे मोठे मुख्य पॅराशूट व समान आकाराचे राखीव पॅराशूट आवश्यक आहे.
या मोहीमेत बर्फाच्छादित शिखर परिसरात पोटात गोळा येणारा पॅराशूट जंप अनुभव, नयनरम्य शेर्पा वस्तीचे नेत्रसुखद दृश्य, जगातील सर्वाच्च माऊंट एव्हेरस्टची पार्श्वभूमी, तर तितक्याच उंचीवरील शिखरांसह संपूर्ण डोंगरदरम्यानचा अनुभव यावेळी अनुभवता येणार आहे. सागरमाथा या राष्ट्रीय उद्यानाला भेट देऊन मोहीमेला सुरुवात करण्यात येणार आहे. स्कायड्राव्हिंग क्रिडा क्षेत्रात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विक्रम प्रस्थापित करण्याचा बहुमान यामुळे मला मिळाला आहे. जगात देशाची प्रतिमा उंचवावी यादृष्टीने हे महत्वपूर्ण पाऊल आहे. या मोहिमेला रिलायन्स फाऊंडेशनने विशिष्ट सहकार्य केले आहे. प्रसिद्ध रिलायन्स फाऊंडेशनने पाठबळ दिल्याने हा नवीन विश्वविक्रम मला प्रस्थापित करता येत आहे.
या मोहिमेत पुढील विक्रम होणार
जागतिक विक्रम
- जगातील सर्वात उंच ठिकाणी पॅराशूटच्या सहाय्याने उडी मारुन लँडिग करणारी जगातील पहिली महिला.
- जगातील तीन्ही ध्रुवांवर पॅराशूट जंप करणारी जगातील पहिली महिला - उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव व जगातील तिसरा ध्रुव म्हणजे माऊंट एव्हरेस्ट.
राष्ट्रीय विक्रम -
- माऊंट एव्हरेस्ट समोर पॅराशूटच्या सहाय्याने उडी मारुन उतरणारी पहिली भारतीय महिला.
- सर्वात उंच ठिकाणी पॅराशूटच्या सहाय्याने उडी मारुन ध्वज घेऊन उतरणारी भारतीय पहिली महिला.
- सर्वात उंच ठिकाणी पॅराशूटच्या सहाय्याने उडी मारुन उतरणारी भारतीय पहिली महिला.
- जगातील तीन ध्रुव म्हणजेच उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव आणि माऊंट एव्हरेस्ट येथे पॅराशूट जंप करणारी पहिली भारतीय महिला.
ही बातमी वाचा: