Sharad pawar : सुप्रिया राजकारणात पडेल असं मला वाटत नव्हतं. हे मी तीस वर्षांपूर्वी बोललो होतो. आता तुम्ही पाहताय ती राजकारणात आली. एका बापाचं असेसमेंट चुकीचं कसं आहे, हे आज माझ्या मुलीनेच सिद्ध केलं, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे. ते पुण्यात बोलत होते.  पुणे डॉक्टर असोसिएशनच्या 'सिंगल डॉक्टर फॅमिली' या उपक्रमाचा शुभारंभ झाला. या कार्यक्रमाला शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी उपस्थिती दर्शवली होती. ज्या पालकांनी स्त्री जन्माचा, खासकरून एकच अपत्य ते ही मुलगी जन्माचा उत्सव साजरा केला आणि कुटुंब नियोजन केले. त्यासह स्त्री पुरुष समानतेचं प्रबोधन केलं अशा कुटुंबांना आज आमंत्रित करण्यात आलं आहे. याच नाविन्यपूर्ण कार्यक्रमात शरद पवार आणि सुप्रिया सुळे उपस्थित आहेत. यावेळी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. 


आई, पत्नी, मुलगी आणि नात या चार पिढ्यांसोबत तुमचं नातं कसं आहे? 


शरद पवार -
माझ्या कुटुंबातील सर्व संस्काराचे श्रेय आईला आहे. शेती, संसार आणि आमचं शिक्षण याची जबाबदारी तिने स्वतः पेलली. घर मोठं होतं, मुलं आणि मुलांना ही शिक्षण दिलं. वडील एकटेच शिक्षित होते, त्यानंतरच्या पिढीत सगळेच उच्चशिक्षित झाले. हे आईमुळं घडलं, त्यामुळं संबंध महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन माझा बदलला. म्हणूनच जेंव्हा निर्णय घेण्याचं पद माझ्याहाती आलं तेव्हा मी महिलांना प्राधान्य दिलं.


52 वर्षांपूर्वी एका मुलीवर कुटुंब नियोजन केल्यावर कोणता सामना करावा लागला?
शरद पवार -
- मला फारसा काही सामना करावा लागला नाही. मात्र निवडणुकीच्या वेळी एकच मुलगी या प्रश्नाला सामोरं जावं लागलं. एकदा मला प्रचारावेळी विचारलं गेलं, एकच मुलगी मग अग्नी कोण देणार? म्हणजे लोकांना अग्नी कोण देणार याची काळजी. मात्र मला ती काळजी नव्हती. मुलगी सगळं करू शकते. हे तेव्हाही मी सांगितलं.



आईच्या पेशन्समुळंच संसार टिकला - सुप्रिया सुळे
माझ्या आईकडे खूप पेशन्स आहेत. त्यांच्या पेशन्समुळंच बहुदा त्यांचा संसार इतका काळ टिकलाय. (मिश्किल टिपणी) मी आईकडून पेशन्स घेतलं आहेत.


देशातील बहुतांश भगत अद्याप ही महिलांना प्राधान्य दिलं जात नाही, काय वाटतं?


शरद पवार - 
उत्तर भागात अद्याप ही महिलांना म्हणाव तसं प्राधान्य दिलं जात नाही. हे लोकसभेत अनेकदा जाणवतं. अगदी स्वपक्षीयांनाही माझं म्हणणं सुरुवातीला पटलं नव्हतं.


विधानसभा आणि लोकसभेत महिला सदस्यांची संख्या वाढवायची असेल तर....?
शरद पवार   
- मानसिकता बदलायला हवी. आम्ही म्हणजे राजकीय प्रमुख. ह्यांनी योग्य दिशा दाखवायला हवी. लोकसभा आणि विधानसभा इथं महिलांची संख्या कमी आहे. का? तर महिला निवडून येईल अशी खात्री अनेकांना वाटत नाही. निवडून आलीच तर ती महिला आपलं काम करेल का? त्यामुळे मतदारांची तीच मानसिकता आहे. विधानसभा आणि लोकसभेत महिलांची संख्या वाढवायची असेल तर यासाठी आपल्याला जनमत तयार करावं लागेल.


इंदिरा गांधींवर काय म्हणाले शरद पवार?
- माझे आणि इंदिरा गांधींचे बऱ्याच मुद्द्यावर वाद झाले. पण असं असलं तरी मी हे सांगू इच्छितो की, इंदिरा गांधींसारखं नेतृत्व क्वचितच पाहायला मिळतं.


वडिलांबद्दल सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
- एका शब्दात वडिलांबद्दल बोलायचं तर ते खूप स्ट्राँग आहेत.