Nana Patole In Pune:  पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे ओबीसी नाहीत, भाजप त्यांना ओबीसी (OBC) म्हणून प्रोजेक्ट करत आहे असा आरोप काँग्रेसच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. ओबीसींची मतं मिळवण्यासाठी त्याचा हा मोठा प्रयत्न आहे, मात्र मोदी हे ओबीसी नाहीत, त्याचे लवकरच पुरावे देऊन असंही त्यांनी म्हटलंय. ते पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते.


पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातमधील श्रीमंत जातींपैकी आहेत, आम्ही ते उघड करणार आहोत, असं मोठं वक्तव्य कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.


भाजपवर टीका करताना नाना पटोले म्हणाले की, "फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला नेणारे सगळे मोदी आणि शाहांचे हस्तक आहेत. त्यांना महाराष्ट्राचं आणि महाराष्ट्रातील तरुण जनतेचं काहीही देणंघेणं नाही. मुख्यमंत्र्यांबाबत काही न बोललेलंच बरं. सध्याचे मुख्यमंत्री नाचगाण्यात व्यस्त आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना असे अनेक प्रकल्प गुजरातला गेले आहेत. त्यांनी काय काय गुजरातला नेलं याची यादी द्यावी. मात्र तेच फडणवीस महाराष्ट्राला गुजरातच्या पुढे नेण्याच्या गोष्टी करतात. राधाकृष्ण विखे पाटील देखील स्वत: केलेला भ्रष्टाचार लपवण्यासाठी भाजपमध्ये गेले."


ओबीसींना राजकीय आरक्षण मिळवण्यासाठी नेमण्यात आलेल्या आयोगाने आडनावावरुन माहिती संग्रहित केली होती. मात्र आडनावावरुन जात समजत नाही. एकाच आडनावाचे लोक अनेक जातींमध्ये असू शकतात. त्यामुळेच मोदी हे ओबीसी नाहीत. त्यासंदर्भातील सगळे पुरावेदेखील आमच्याकडे आहेत. हे पुरावे लवकरच जनतेपुढे आणू, असंही नाना पटोले यांनी स्पष्ट केलं आहे. 


महागाई आणि भ्रष्टाचारापासून लक्ष वळवण्याचं काम सुरुच


नाना पटोले म्हणाले की, "देशात महागाई वाढली आहे. नागरिकांच्या अनेक समस्या आहेत. त्यासोबतच भ्रष्टाचारदेखील मोठ्या प्रमाणात सुरु आहे. याकडे भाजपचं लक्ष नाही. भाजप आणि मोदी हे जाती-धर्माचं राजकारण करतात. त्यात फूट पाडण्याचं काम करत आहेत. ईडी, सीबीआय आणि प्रसारमाध्यमांचा गैरवापर करुन देशाचं संविधान मोडीत काढण्याचं काम सुरु आहे. त्यासाठी राहुल गांधी यांनी देशात भारत जोडो यात्रा सुरु केली आहे. यानंतर कॉंग्रेस देशात वेगवेगळ्या योजनादेखील राबवणार आहे."


दरम्यान, फॉक्सकॉन वेदांता या प्रकल्पावरुन महाराष्ट्रात राजकारण पेटलं आहे. त्यात विरोधी पक्षाकडून मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडून मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला असता. मात्र हा प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे महाराष्ट्रातील तरुणांच्या तोंडाचा घास या सरकारने हिरावून घेतला आहे, अशी टीका राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे.