पुणे: बारामती नमो रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने (Baramati Namo Rojgar Melava) मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री येत्या शनिवारी बारामती दौऱ्यावर असणार आहेत. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बारामतीत एवढा मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. यादरम्यान एक मोठी माहिती समोर येत आहे. बारामतीत येणाऱ्या मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना शरद पवारांनी (Sharad Pawar) फोन करून त्यांच्या घरी जेवणाचे निमंत्रण दिलं आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar) विनंतीवरून येणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) शरद पवारांचे निमंत्रण स्वीकारणार का हे पाहावं लागेल.


बारामतीत येत्या शनिवारी शासकीय कार्यक्रम असतानाही, राज्यसभेचे खासदार असणाऱ्या शरद पवारांना या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आलं नाही. आता शरद पवारांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना त्यांच्या घरी जेवणाचे आमंत्रण दिलं असताना ते आमंत्रण स्वीकारलं जाईल का हे पाहावं लागेल. 


बारामतीमध्ये शरद पवारांचे घर असल्याने आणि राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री बारामतीत येणार असल्याने हे निमंत्रण देण्यात आल्याची माहिती आहे.


बारामतीला जेव्हा कुणीही येतं त्यावेळी शरद पवार हे आवर्जून त्यांना घरी बोलावतात, अथिती देवो भवः ही आमची संस्कृती असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. राज्याचे मुख्यमंत्री जर बारामतीला येत असतील तर त्यांना बोलावणे ही आमची संस्कृती असल्याचंही त्या म्हणाल्या. 


शरद पवारांना कार्यक्रमाचे निमंत्रण नाही


विद्या प्रतिष्ठान येथील 12 एकराच्या मैदानावर बारामती रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित असणार आहेत. मात्र या कार्यक्रमाला शरद पवारांना निमंत्रण देण्यात आलं नसल्याची माहिती समोर आली आहे. येत्या 2 मार्च रोजी बारामतीमध्ये रोजगार मेळावा होणार असून त्या कार्यक्रमाला खासदार अमोल कोल्हे आणि वंदना चव्हाण यांनाही निमंत्रण देण्यात आलं आहे. राज्यसभेचे खासदार असणाऱ्या शरद पवारांचे नाव मात्र वगळण्यात आल्याने त्यावर राजकीय चर्चा सुरू आहे. या कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे यांना मात्र निमंत्रण देण्यात आलं आहे. 


ही बातमी वाचा: