पुणे : पुण्यातील पब(Pubs), बार(Bar), रेस्टोरंट आणि हॉटेल्स पूर्वीप्रमाणेच रात्री दीड वाजेपर्यंत सुरु ठेवता येणार आहेत. हॉटेल आणि पब मालकांनी नियमांचं पालन केल्यास पोलीस (Pune Police) आतमध्ये येऊन कोणत्याही प्रकारे अडथळा निर्माण करणार नाहीत, असं आश्वासन पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पब आणि बार मालकांना बैठकीनंतर दिलं आहे. मात्र कोणत्याही प्रकारच्या हुक्क्याला इथून पुढे पुण्यात बंदी असणार आहे .
महानगरांची नाईट लाईफ ज्यांच्यावर अवलंबून असते ते पब, बार आणि रेस्टोरंट एकाचवेळी सरकारसाठी उत्पन्नाचा मोठा स्रोत असतात तर दुसरीकडे गैरप्रकार रोखण्यासाठी या पब आणि बारवर पोलिसांनी बारीक नजर ठेवणंही आवश्यक असतं . अनेकदा पब आणि बार मालकांकडून नियमांचं उल्लंघन केल्याचा दावा करत पोलिसांकडून कारवाई करण्यात येते तर पोलीस जाणीवपूर्वक त्रास देत असल्यानं व्यावसायावर परिणाम होत असल्याची पब आणि बार मालकांची तक्रार असते. यावर उपाय शोधण्यासाठी पुण्यातील पब, बार आणि हॉटेल व्यवसायिकांची पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीत पुण्यातील पब, बार आणि सर्व प्रकारची हॉटेल्स पूर्वीप्रमाणे दीड वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास इथून पुढे देखील परवानगी असणार आहे. पोलीस आयुक्त्यांच्या या भूमिकेमुळे अनेकदा स्थानिक पोलिसांकडून होण्याऱ्या विनाकारण त्रासाला आळा बसेल, असं पब मालकांना वाटत आहे. मात्र रात्री दीड वाजेपर्यंत पब आणि रेस्टोरंट सुरु ठेवताना पब आणि रेस्टोरंट मालकांना नियमांचं पालनही करावं लागणार आहे.
काय असेल नियमावली?
-इथून पुढे कोणत्याही प्रकारच्या हुक्क्याला पुण्यात बंदी असणार आहे .
-रूफ टॉप हॉटेलमधील साउंड सिस्टीम रात्री दहा वाजता बंद करावी लागणार आहे .
-परवाना नसलेल्या हॉटेलमध्ये दारू पिताना आढळल्यास दारू पिणार्यावर आणि हॉटेल मालक अशा दोघांवर कारवाई करण्यात येणार आहे .
-पोलिसांनी गरज असेल तरच बार आणि पबच्या आतमध्ये प्रवेश करावा अन्यथा व्यवसायायात अडथळे आणू नयेत अशा सूचना देण्यात आल्यात .
पोलिसांनी घेतलेल्या या भूमिकेचं हॉटेल आणि पब व्यवसायिकांबरोबरच सामान्य जनतेकडून स्वागत करण्यात येतं आहे. लोकांना त्रास न होता हॉटेल्स आणि पब सुरु राहण्यास हरकत नाही, असं लोकांचं म्हणणंय. पब, हॉटेल आणि बार ही पुण्यासारख्या महानगरांमध्ये एकाचवेळी तरुणाईच्या आकर्षणाची केंद्रं आहेत तर दुसरीकडे नशेच्या बाजारांचे अड्डे देखील इथूनच चालवले जात असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळं तरुणाईने नाईट-लाईफ एन्जॉय करावी, पण नियमांचं भान राखून एवढीच पुणे पोलिसांची अपेक्षा आहे.
इतर महत्वाची बातमी-