पुणे : वयोमान, आजारपणामुळे अनेक ज्येष्ठ मतदारांना (Pune News) त्यांचा मतदानाचा अधिकार (Senior Citizen Votting) बजावताना अडचणी निर्माण होतात. त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होतो. हे टाळण्यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून 80 वर्षापुढील ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांसाठी ‘घरातून मतदान’ या विशेष उपक्रमाद्वारे घरातूनच मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती अपर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली.
देशपांडे म्हणाले, अनेकदा ज्येष्ठ नागरिकांचे वयोमान, त्यांचे आजारपण या कारणांमुळे त्यांना मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होता येत नाही. मतदानापासून कोणीही वंचित राहू नये आणि ज्येष्ठ नागरिकांना मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होता यावे यासाठी हा उपक्रम निवडणूक आयोगातर्फे प्राधान्याने राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत मतदार यादीमध्ये चिन्हांकित केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना 12 -डि क्रमांकाचा अर्ज पुरविण्यात येणार असून तो भरुन निवडणूक घोषित झाल्यानंतर पाच दिवसाच्या आत जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करावयाचा आहे. जिल्हाधिकारी या मागणीवर अंतिम निर्णय घेणार असून त्यानंतर प्रत्यक्ष मतदानासाठी तात्पुरत्या मतदान केंद्राची उभारणी संबधित मतदाराच्या घरी करण्यात येणार आहे. ज्येष्ठ मतदारांसाठी ही एक संधी असली तरीही ज्यांना शक्य आहे अशा ज्येष्ठ नागरिकांनी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे आणि इतरांना आदर्श घालून द्यावा असे आवाहन देशपांडे त्यांनी केले.
ते पुढे म्हणाले, निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव असून, मतदानामुळे लोकशाही बळकट होते. या प्रक्रीयेत सर्वांनी सहभागी होण्यासाठी निवडणूक आयोगातर्फे विशेष प्रयत्न करण्यात येत आहे. निवडणूक प्रक्रिया सुरु झाल्यानंतर वगळण्यात आलेल्या मतदार यादीतील नावांची स्वतंत्र यादी ठेवण्यात येणार आहे. निवडणूक प्रक्रिया, मतदान प्रक्रिया तसेच मतमोजणीची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी आणि प्रक्रियेतील त्यांचा सहभाग वाढावा आणि पर्यायाने मतदानाचा टक्का वाढावा यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग मोठया प्रमाणावर घेण्याचे निवडणूक आयोगाने नियोजन केले आहे. निवडणूक आयोगाने केलेल्या नवीन बदलांची कोटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येत असून, त्यासाठी जिल्हानिहाय आढावा घेण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.
निवडणूक कार्यासाठी कर्तव्यावर असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना मतदान करता यावे यासाठी, सुविधा केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता असावी यासाठी सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती, वेब कास्टींग, संवेदनशील मतदान केंद्राची निगराणी, आदर्श आचार संहितेच्या भंगाच्या तक्रारींबाबत सी-व्हीजील ॲपच्या माध्यमातून कार्यवाही या बाबींवर भर देण्यात आला आहे.
इतर महत्वाची बातमी-