School First Day: कोरोनानंतर दोन वर्षांनी आमचं मुल शाळेत जाणार या सगळ्याचा आनंद मुलाला होताच मात्र आम्हा दोघांना आणि कुटुंबीयांना देखील वाटत होता. गेली दोन वर्ष आमच मुलं घरात आहे. कोरोनाच्या निर्बंधामुळे अनेकदा शाळेत किंवा खेळायलासुद्धा पाठवण्याची भीती आम्हाला दोघांना वाटत होती. आज तो शाळेत जाणार म्हणून सकाळपासून लगबग सुरु होती. बोबड्या शब्दांत शाळेत जाऊन नेमकं काय बोलणार? फार गडबड करणार नाही ना?, असे अनेक प्रश्न पालक म्हणून मनात घोंघावत आहेत मात्र त्याला शाळेच्या गणवेशात पहिल्यांदा पाहिल्यावर जरा गहिवरुन आलं होतं, असं प्राजक्ता लुतडे सांगतात.


आजपासून राज्यातील शालेय वर्षाची सुरुवात होणार आहे. शाळेच्या आवारात पुन्हा एकदा घंटानाद होणार आणि शाळा भरणार आहे. अनेक बालकांचं आज औपचारिक शिक्षणाच्या दृष्टीने पहिले पाऊल असणार आहे. शाळेत विद्यार्थ्यांचं जंगी स्वागत करण्यात येत आहे. कोरोनानंतर पहिल्यांदाच शाळा ऑफलाईन पद्धतीने सुरु झाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी, पालकांबरोबरच शाळेतील या शालेय वर्षासाठी शिक्षकही आतुर आहेत. या विद्यार्थ्याचं प्रत्येक पहिलं पाऊल देश घडवण्यात मदत करणार आहे. त्यामुळे शैक्षणिकदृष्या आणि सामाजिक दृष्या विद्यार्थ्यांना सक्षम बनवण्याकडे अनेक शिक्षकांचा कल आहे.




माझा मुलगा मृदूल 3 वर्षांचा आहे. गेल्या 15 दिवसांपासून त्याच्या शाळेच्या पहिल्या दिवसाची तयारी घरात जोमात सुरु होती.  आवडत्या कार्टूनच्या वस्तू घेण्यापासून तर प्रत्येक वस्तूवर त्याचं नाव लिहिण्यापर्यंत सगळी लगबग सुरु होती. आम्ही दोघेही नोकरी करतो. शाळेत जाण्यापुर्वी त्याला काही बेसिक गोष्टी शिकवण्याचा आम्ही प्रयत्न केलाय. दोघेही नोकरी करत असल्यामुळे त्याचा अभ्यास घेणं म्हणजे आमच्यासाठी थोडी कसरत होती. मात्र त्याचा सर्वांगिण विकास कसा होईल?, तो प्रत्येक गोष्टीत सक्रिय कसा राहिल? याकडे आम्ही नेमाने लक्ष ठेवत होतो. मागील 15 दिवसांपासूनची त्यांच्या शाळेची लगबग थांबली आणि अखेर त्याने शाळेचा गणवेश परिधान केला. आई-वडिल हे मुलांचे पहिले शिक्षक असतात मात्र आज तो त्याच्या नव्या औपचारिक शिक्षणाच्या दृष्टीने पहिले पाऊल असल्याने आम्ही कुटुंबीय आनंदी आहोत. पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढून या चिमुरड्यांवर निर्बंधाची चादर घालू नये, असं  मनापासून वाटतं, असं मृदूलचे आई-वडिल प्राजक्त लुतडे आणि मयूर लुतडे सांगत होते.


आम्ही नागपूरमध्ये राहतो. आरवच्या शाळेची निवड करणं आमच्यासाठी पहिलं आव्हान होतं. मी चित्रकला शिक्षिका होते. त्यामुळे शाळेतलं साधारण वातावरण मला माहित आहे. शाळेतील विद्यार्थ्यांची मानसिकता देखील मी जाणून आहे. मुलांचा कल ओळखून त्याला योग्य दिशा देण्यासाठी शाळेची योग्य निवड महत्वाची असते. त्यामुळे आम्ही नागपूरमधील सी. जी. वंजारी नर्सरी स्कूलची निवड केली. त्याच्या शाळेच्या पहिल्याच दिवशी तो स्वत: उत्साहात दिसल्याने आम्ही देखील आनंदी आहोत. कोरोनानंर मुलांना निदान शाळेत जायला मिळतंय हिच मोठी गोष्ट आहे, असं आरवची आई राधिका करोले सांगत होती.


मी इंजिनिअर आहे. आम्ही पुण्यात राहतो. ह्रदयचा जन्म झाल्यापासून मी संपुर्ण लक्ष त्याच्या सर्वांगिण विकासावर दिलं. कोरोनाच्या दिवसात त्याला अनेक गोष्टी घरीच चांगल्या पद्धतीने शिकवण्याता प्रयत्न केला. वेगवेगळ्या माईंडचेक अॅक्टीव्हीचा त्याच्यावर प्रयोग केला. नवीन श्लोक, प्रार्थना शिकवल्या मात्र शाळेतलं शिक्षण आणि घरच्या शिक्षणात फरक पडतो. मुलं शाळेत सगळ्या मुलांच्या सानिध्यात शिकतात. त्यामुळे त्यांच्यातला आत्मविश्वास वाढतो, असं मला वाटतं. ह्रदय फार मस्तीखोर नाही मात्र तो प्रत्येक नव्या गोष्टीकडे वेगळ्या पद्धतीने पाहतो. त्याला अनेक प्रश्न पडतात. मुलांना प्रश्न पडायला हवेत जेणेकरुन त्या मुलांमध्ये प्रत्येक गोष्टींबाबत कुतूहल निर्माण होईल. त्याच्यासाठीच नाही तर प्रत्येक आईसाठी आपलं मुलाच्या पहिल्या गोष्टी कायम स्पेशल असतात. तसाच आजचा दिवस माझ्यासाठी स्पेशल आहे, असं अवंती सिद्धमशेट्टीवार सांगते.


कोरोनानंतर मुलांचं शाळेतील पहिलं पाऊल प्रत्येक पालकांसाठी स्पेशल असतं आज पुन्हा एकदा याच नाहीतर अनेक पालकांच्या विविधांगी भावना असतील. अनेक पालकांना आपल्या मुलांकडून अनेक अपेक्षा असतील मात्र या अपेक्षापुर्तीचं पहिलं पाऊल म्हणजे आपल्या पाल्याचा शाळेचा पहिला दिवस असतो.