पुणे: पुण्यामध्ये अपघाताची एक धक्कादायक घटना घडली आहे. स्कूल बसच्या चाकाखाली आल्याने एका 12 वर्षाच्या मुलाचा जागीत मृत्यू झाला आहे. दुपारी तीन वाजता झालेल्या भीषण अपघातात पुण्यातील वडगाव खुर्द येथे पब्लिक स्कूलची  बस वळण घेत असताना मागच्या चाकाखाली आल्याने या मुलाचा मृत्यू झाला आहे. अर्णव अमोल निकम (रा. -राजयोग सोसायटी, वडगाव खुर्द) असं या मुलाचं नाव असून त्याच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


कसा घडला अपघात?
शाळेच्या विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी राजयोग सोसायटी जवळील पीएमपीएलच्या बस थांब्या स्कूलबस आली होती. बस थांब्यावर अर्णव निकम आणि इतर विद्यार्थी उतरल्यावर  स्कूल बस वळण घेऊ लागली. त्यावेळी चालकाचे लक्ष नसल्याने काही कळण्याच्या आगोदरच बसचे मागील चाक अर्णवच्या अंगावरून गेले. या घटनेत अर्णवचा दुर्दैवी मत्यू झाला. अर्णवच्या या दुर्दैवी मृत्यूमुळे त्याच्या पालकांवर मोठा आघात झाला असून त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.


या घटनेप्रकरणी बस चालक दत्तात्रय लक्ष्मण परेकर (वय-49,रा. धनकवडी) याला ताब्यात घेण्यात आलं असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शैलेश संख्ये करत आहेत.


ज्यावेळी अर्णवचा बसच्या चाकाखाली येऊन अपघात झाला, त्यानंतर त्याला लगेच जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं रुग्णालयाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं. 


दरम्यान, शाळेच्या बसमध्ये चढताना आणि उतरताना मुलांनी आवश्यक ती काळजी घ्यावी अशं आव्हान पोलिसांच्या वतीनं करण्यात आलं आहे. 


संबंधित बातम्या: