Home Loan : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) रेपो दरात वाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर गृहकर्जावरील व्याजदर महाग झालं होतं. पण सणासुदीच्या काळात घर खरेदी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बँका स्वस्तात गृहकर्ज देत आहेत. एसबीआय (SBI), एचडीएफसी (HDFC), बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra) आणि बजाज हाऊसिंग फायनान्स (Bajaj Housing Finance) या देशातील सर्वात मोठ्या बँकांनी सणासुदीच्या काळात गृहकर्जाचे व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.


दिवाळीच्या मुहूर्तावर बॅंकांकडून गृहकर्जाच्या व्याजदरात मोठी सूट देण्यात येत आहे. बॅंक ऑफ महाराष्ट्राने गृहकर्ज आणि वैयक्तिक कर्जाच्या व्याजदरात कपात केल्यानंतर आता एसबीआय, एचडीएफसी, बॅंक ऑफ बडोदा आणि बजाज हाऊसिंग फायनान्सकडूनही व्याजदरात कपात करण्यात आली आहे. बँकांकडून सणाच्या निमित्ताने कर्ज स्वस्त झाल्याने गृह खरेदी वाढण्याची शक्यता आहे.


बॅंक ऑफ महाराष्ट्रकडून गृहकर्ज 0.30 ते 0.70 टक्के तर वैयक्तिक कर्ज 2.50 टक्क्यांनी स्वस्त, सोबतच सोन्यावरील कर्ज आणि चारचाकी गाडीवरील कर्जाची प्रोसेसिंग फी न घेण्याची योजना जाहीर केली आहे. एसबीआयने गृहकर्जात 0.25 टक्क्यांची सूट तर एचडीएफसी क्रेडिट स्कोअर चांगला असलेल्यांना 8.4 टक्क्यांनी गृहकर्ज उपलब्ध करुन देत आहे. बॅंक ऑफ बडोदाने 8.45 क्के तर बजाज हाऊसिंग फायनान्सकडून 8.2 टक्क्यांनी कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. 


SBI गृहकर्ज स्वस्त
सण आणि दिवाळी ऑफर अंतर्गत स्टेट बँक ऑफ इंडिया स्वस्तात गृहकर्ज देत आहे. बँकेने गृहकर्जाच्या व्याजदरात 0.25 टक्क्यांनी कपात केली असून, त्यानंतर व्याज 8.40 टक्क्यांपासून सुरु होत आहे. SBI टॉप अप कर्जावर 0.15 टक्के आणि मालमत्तेवरील कर्जावर 0.30 टक्के सूट देत आहे. बँकेने जानेवारी 2023 पर्यंत प्रक्रिया शुल्क न आकारण्याचा निर्णय घेतला आहे.


HDFC कडून स्वस्त गृहकर्ज ऑफर
एचडीएफसीने स्वस्त गृहकर्जाच्या ऑफरही आणल्या आहेत. गृहकर्जाची रक्कम विचारात न घेता एचडीएफसी 750 पेक्षा जास्त क्रेडिट स्कोअर असलेल्यांना 8.40 टक्के दराने गृहकर्ज देत आहे. ही ऑफर 30 नोव्हेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. यापूर्वी, एचडीएफसी क्रेडिट स्कोअरवर अवलंबून 8.60 ते 9 टक्क्यांपर्यंत गृहकर्ज देत होती.


बजाज फायनान्सकडून ऑफर
बजाज हाऊसिंग फायनान्सने दिवाळी स्पेशल ऑफर आणली आहे ज्यामध्ये 8.2 टक्के दराने गृहकर्ज दिलं जात आहे. ही ऑफर नोकरदार आणि व्यावसायिक लोकांसाठी आहे. स्वस्त गृहकर्ज ऑफर 14 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान खुली असेल आणि फक्त निवडक ठिकाणांसाठी लागू आहे.


बँक ऑफ महाराष्ट्र परवडणारे गृहकर्ज
बँक ऑफ महाराष्ट्रनेही सणासुदीच्या काळासाठी गृहकर्जाच्या व्याजदरात 30 ते 70 बेसिस पॉईंटची कपात केली आहे. बँकेचे गृहकर्ज 8 टक्क्यांपासून सुरु होते. बॅंक ऑफ महाराष्ट्रकडून वैयक्तिक कर्ज 2.50 टक्क्यांनी स्वस्त करण्यात आलं आहे.