Palkhi sohala News : आज पुण्यनगरीत संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj) आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्यांचं ( Sant Dnyaneshwar Maharaj palkhi) मनोमिलन होणार आहे. त्यासाठी पुण्यातील (Pune) वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा पिंपरी चिंचवड येथून रविवारी दुपारनंतर पुण्यात दाखल होणार आहे. दरम्यान, कोणकोणत्या ठिकाणी वाहतुकीत बदल होणार आहेत, याबाबतची माहिती पाहुयात. 


कोणता मार्ग वाहतुकीसाठी बंद असणार?


बोपोडी चौक, खडकी रेल्वे स्थानक, मरिआई गेट चौक, कमल नयन बजाज चौक, जुन्या मुंबई - पुणे महामार्गावरील वाकडेवाडीपर्यंतचा रस्ता वाहतूक बंद असणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखीसाठी कळस फाटा ते विश्रांतवाडी चौक मार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे. येरवड्यातील मनोरुग्णालय (मेंटल कॉर्नर) ते आळंदी रस्ता चौक बंद राहणार आहे. तसेच चंद्रमा चौक ते आळंदी रस्ता बंद असणार आहे. दरम्यान, नवीन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेतू ते चंद्रमा चौक, होळकर पूल ते साप्रस चौकीपर्यंत वाहतूक बंद राहणार आहे. या कालावधीत आळंदीकडे जाणारे रस्ते आवश्यकतेनुसार बंद राहतील, बाकी रस्ते सुरू राहतील अशी माहिती प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे. 


ज्ञानोबा-तुकोबांच्या गजरात संपूर्ण अलंकापुरी दुमदुमली


दरम्यान, काल (29 जून) संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान झालं. सायंकाळी 7.08 मिनिटांच्या दरम्यान पालखीचे प्रस्थान झाले. यावेळी मानाच्या 48 दिंड्यांनी माऊलींच्या पादुका मार्गस्थ होताना जय हरी विठ्ठलाचा जल्लोष केल्याचे पाहायला मिळालं. तिन्ही संजेच्या वेळी माऊलींनी प्रस्थान ठेवलं आणि यावेळी संपूर्ण अलंकापुरी दुमदुमली होती. त्यानंतर पालखी मंदिराच्या आवारात प्रदक्षिणा घातली. रात्री पालखीचा मुक्काम हा परंपरेनुसार माऊलींच्या आजोळघरी झाला. 


वारकरी गाठतात साधारण 250 किलोमीटरचा पायी पल्ला 


वारकरी आळंदी ते पंढरपूर आणि देहू ते पंढरपूर असा साधारण 250 किलोमीटरचा पल्ला पायी पार करतात. मात्र, या वारकऱ्यांना ना कुठे शीण येत ना वारकरी दमतात. कारण वारकरी नाचत गात टाळ वाजवत आणि हरिनामाचा गजर करत पुढे चालतात. फुगडी भजन करत मजल दर मजल करत पंढरपूर गाठत असतात. वारीत शेतकरी मंडळी जास्त प्रमाणात सहभागी होतात. तसेच नोकरदार, सामाजिक क्षेत्रात काम करणारे तरुण तरुणी देखील मोठ्या प्रमाणात या वारीत सहभागी होतात. 


महत्वाच्या बातम्या:


Sharad Pawar : मोठी बातमी : शरद पवार पायी वारीत सहभागी होणार, 'आषाढी'ला वारकऱ्यांसोबत चालणार!